Download App

‘मनु’ आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला, लई वाईट वाटलं असल…; अमोल मिटकरींची भिडेंवर टीका

  • Written By: Last Updated:

Amol Mitkari on Sambhaji Bhide : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या अथक प्रयत्नांमुळे भारताची चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहीम यशस्वी झाली. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वीरित्या उतरल्याचा ऐतिहासिक क्षण संपूर्ण जगाने पाहिला आणि भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. यानंतर जगभरातून इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही इस्रोचे अभिनंदन केले. दरम्यान, इस्त्रोचं अभिनंदन करतांना त्यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर निशाणा साधला.

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर, भारतीय तिरंगा झेडा आणि चांद्रयानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या तिरंग्या झेंड्यांच्या फोटोवरून मिटकरी यांनी भिडेंना टोला लगावला. मिटकरी यांनी ट्विट करत लिहिलं की, “मनु” आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला. लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी. पण हे खरं हाय अन् यात नेहरूजींचं योगदान बी हाय म्हणत्यात. आता कसं. जयहिंद, असं ट्विट मिटकरींनी केलं.

काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. नेहरूंचं देशासाठी काहीही योगदान नाही अशा शब्दात त्यांनी नेहरुंवर टीका केली होती. तिरंगा झेंड्याबाबतही आक्षेप घेतला होता. भारताच राष्ट्रध्वज हा तिरंग्याऐवजी केवळ भगवा असावा, अशी मागणी भिडेंनी केली होती. हाच धागा पकडून मिटकरी यांनी भिडेंवर टीका केली.

‘पवार साहेब चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री’; सुळेंचे वळसे पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर 

दरम्यान, भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन… हे यश फक्त तुमचे आणि तुमचेच आहे… कुठल्याही कर्मकांडानं आणि प्रार्थना करून हे यशस्वी झाले नाही. यामागे शास्त्रज्ञांची अखंड मेहनत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला. ज्यांच्या मेहनतीमुळे हा विक्रम शक्य झाला त्या सर्व शास्त्रज्ञांना सलाम, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारताला चंद्रावरील या मोहिमेत आलेल्या यशानं जगाचे लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वीच रशियासारख्या विकसित देशाची चंद्रावर मोहीम अपयशी ठरली होती. या पार्श्वभूमीवर इस्रोचे हे यश अनेकांच्या कौतुकाचा विषय बनले आहे.

Tags

follow us