पुणे : भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्यातील मान- खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून प्रकृती चांगली झाल्याने डिस्चार्ज मिळाला आहे.
डिसेंबर महिन्याच्या शेवटी गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. यामुळे त्यांना 24 डिसेंबरला पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते 5 जानेवारी येथेच उपचार घेत होते. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आहे. यामुळे ते आपल्या घरी परतले आहेत.
रुबी हॉल रुग्णालयाच्या न्यूरो ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे म्हणाले, आमदार गोरे यांचे वाहन तीस फूट खोल दरीमध्ये कोसळल्याने त्यांच्या बरगड्या मोडल्या झाली होत्या. यामुळे त्यांना श्वसनास त्रास होत होता. मात्र अतिदक्षता विभाग आणि फिजिओथेरपी यांच्या प्रयत्नाने त्यांची प्रकृती आता सुधारली आहे. यामुळे त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. झिरपे यांनी सांगितले.
आमदार गोरे म्हणाले, मला रुबी हॉल या रुग्णालयात दाखल केल्यानंतर मला योग्य आणि गतीने उपचार मिळाल्याने माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. दरम्यान रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका कर्मचारी यांनी अत्यंत आपुलकीने वागणूक दिल्याचे समाधानही गोरे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पुणे-पंढरपूर मार्गावर गोरे यांची गाडी फलटण जवळील 30 फूट खोल खड्ड्यात पडल्याने त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्यासोबत असलेले अन्य तीन सहकारी देखील जखमी झाले आहेत.