Download App

‘१० वर्षात देश रसातळाला, आता भाजपला घरी बसवणार’; ब्रिटीशांची उपमा देत पटोलेंची जळजळीत टीका

  • Written By: Last Updated:

Nana Patole : देशावर जेव्हा संकट येते, तेव्हा याच नागपूरच्या भूमितून कॉंग्रेसने (Congress) एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान आणि लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत, ही व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे. 28 रोजी नागपुरात काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जुलमी, अत्याचारी व अंहकारी सरकारला घरी पाठवण्यासाठी एल्गार पुकारून परिवर्तनाचा संदेश दिला जाणार आहे, असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सांगितलं.

Letsupp Special : भाजपचा ‘अशोक चव्हाणांवर’ डोळा; पण कट्टर काँग्रेसी गळाला लागणार का? 

नागपुरातील ‘भारत जोडो’ मैदानावर काँग्रेस पक्षाचा 138 वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून देशभरातील काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले आहेत.

मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकत्र झाला व हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानाने जुलमी, अत्याचारी ब्रिटिशांना देश सोडण्यास भाग पाडले. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे, आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीतून देश वाचवण्याच्या लढाईचा एल्गार पुकारला जात आहे. 60 वर्षांच्या काँग्रेस सत्तेत पंडित जवाहरलाल नेहरुंपासून डॉ. मनमोहन सिंग या सर्वांनी भारताला एक महाशक्ती म्हणून उभे केले. पण, दुर्दैवाने मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशाला रसातळाला नेले आहे, अशी टीका पटोलेंनी केली.

स्वकर्तृत्वावर तयार झालेले पवार अन् काकांच्या सावलीत वाढलेल्या दादांमध्ये मोठं अंतर, आव्हाडांचा हल्लाबोल… 

भाजपाला सत्तेतून खाली खेचू- पटोले
ते म्हणाले, जाती-धर्माच्या नावावर लोकांमध्ये संघर्ष निर्माण करून देशाला अधोगतीकडे नेले आहे. आज देश विकून देश चालवला जात आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जात असून त्यांना घाबरवले जात जात आहे. संसदेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल 150 खासदार निलंबित केलं, पण काँग्रेस अशा कारवाया भीक घालत नाही. जगातील सर्वात बलाढ्य इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले, त्याचप्रमाणे आम्ही या हुकूमशाही भाजपला घरी बसवू. राहुल गांधींनी ‘डरो मतचा’चा नारा दिला आहे. त्याच मार्गाने जावून भाजपाला सत्तेतून खाली खेचू, असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला.

आज महागाई, शेतकरी, कामगार, तरुणांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. सरकारी यंत्रणांना वेठीस धरले आहे. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांना शिक्षा होत आहे. कठीण परिस्थितीतून जात असलेल्या देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसची ही लढाई आहे आणि देश वाचवण्याची काँग्रेसची गॅरंटी आहे. 28 तारखेला नागपूरमध्ये होणाऱ्या महामेळाव्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून या महामेळाव्यातून परिवर्तनाचा एल्गार पुकारला जाणार आहे, असं पटोले म्हणाले.

 

follow us