Nana Patole on BJP : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी आध्यात्मिक कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका, अशी शिकवण होती. पण, आज भाजपच्या (BJP) राज्यात शेतकरी दररोज मरत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणंघेणं नाही. अनेक पक्षांची सरकारं आली आणि गेली पण त्यांनी राजकारणासाठी धर्माचा वापर केला नाही. मात्र भारतीय जनता पक्ष आपल्या राजकारणासाठी धर्माचा वापर करत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
PM Modi कडून शिंदे, फडणवीस, अजितदादांचे कौतुक तर, भिजत घोंगड्या प्रकल्पांवरून कॉंग्रेस टार्गेट
प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सेल व विभागातील महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रज्ञा वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, यापूर्वीही अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी आम्ही देणगी आणि विटा दिल्या होत्या, राम मंदिरासाठी न्यास आहे. मात्र भाजप राम मंदिराचे राजकारण करत आहे. अयोध्येतील अर्धवट बांधलेले राम मंदिर पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील, परंतु निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उठवण्यासाठी अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई भाजपला झाली आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
अबकी बार ‘400 पार’ ची जबाबदारी आमची; CM शिंदेंनी मोदींसमोर फोडला लोकसभा निवडणुकांचा नारळ
हिंदू धर्माचे सर्वोच्च असलेल्या चारही शंकराचार्यांचा अशा पद्धतीच्या प्राणप्रतिष्ठेला विरोध आहे. अर्धवट बांधकामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे शंकराचार्य सांगत आहेत. पण भाजप त्यांचेही ऐकत नाही. भारतीय जनता पक्ष धर्म भ्रष्ट करत असून त्याचा दोष काँग्रेस पक्षावर फोडत आहे, असा हल्लाबोल पटोलेंनी केला.
पटोले म्हणाले, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. त्यावेळी जुलमी व्यवस्थेशी लढा देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मोठ्या हिंमतीने लढा दिला, त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. तेच आमचे प्रेरणास्त्रोत आहेत, त्यांच्या विचार घेऊन पुढे जाऊ. आज आपण स्वतंत्र आहोत, आपल्याला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. भाजपच्या जुलमी व्यवस्थेविरुद्ध आपण उभे राहून आवाज उठवला पाहिजे. महिला शक्ती ही महान शक्ती आहे, या शक्तीने भाजपच्या जुलमी व्यवस्थेविरोधात आवाज उठवला पाहिजे. या महिला काँग्रेसच्या विविध विभाग व सेलच्या माध्यमातून गावागावात काँग्रेसच्या विचाराचा प्रचार करत असून, त्यांनी असाच प्रचार सुरू ठेवावा आणि जुलमी व्यवस्था संपवून काँग्रेसचे सरकार परत आणावे, असे आवाहन पटोले यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ‘Donate For Desh’ अभियान सुरू केले आहे. या मोहिमेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन 138 रुपयांच्या पटीत ऑनलाइन देणगी देण्याचे आवाहनही पटोले यांनी केले.