Download App

खाजगी व सरकारी रुग्णालयात मोफत उपचाराचा कायदा आणणार का? पटोलेंचा सरकारला थेट सवाल

  • Written By: Last Updated:

Nana Patole : गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याची मागणी होत होती. दरम्यान, काल अखेर राज्य सरकाराने यापुढे आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध होणार असल्याचा निर्णय घेतला. मात्र, या घोषणेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patol) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकारी रुग्णालयात मोफत उपचार करण्याची घोषणा सरकारने केली, यात नवीन काय? सरकारी रुग्णालयात मोफत उपचार (free treatment) केले जातात. प्रत्येक व्यक्तीला खाजगी आणि सरकारी रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी कायदा आणणार आहे का, असा सवाल पटोले यांनी केला. (nana patole on state goverment over free treatment on public hospital)

याबाबत प्रश्न उपस्थित करतांना पटोले म्हणाले की, राजस्थान सरकारने खाजगी आणि सरकारी रुग्णालयात 10 लाखांपर्यंत मोफत उपचाराची सोय केली आहे, याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. त्यासाठी कागदपत्रे जोडण्याची गरज नाही. मोफत आरोग्य सेवा देणे हे सरकारचे काम आहे. या आपल्या राज्य सरकारने सरकारी रुग्णालयात मोफत उपचाराची घोषणा केली, यात नवीन काय? सरकारी रुग्णालयात मोफतच उपचार केले जातात. पण सरकारी रुग्णालयेच आजारी पडलेले आहेत, मशीन आहेत पण डॉक्टर आणि परिचारिका नाहीत, अशी व्यवस्था आपल्या आरोग्य विभागाची आहे. सरकार आरोग्याचा कायदा करून प्रत्येक व्यक्तीला खाजगी व सरकारी रुग्णालयात मोफत आरोग्य सवा देणार असा कायदा आणणार आहे का? ह्याचं उत्तर दिलं पाहिजे.

पावसाळी अधिवेशन जनतेच्या तोंडाला पाने पुसणारेच ठरले; पटोलेंचा सरकारवर घणाघात 

कोरोनाच्या काळात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार सुरू होता, ही इंजेक्शन्स 50,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत विकली गेली. रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या गुजरातच्या व्यावसायिकाला वाचवण्यासाठी पहाटे 2 वाजता पोलिस स्टेशनमध्ये कोण गेले हे सर्वांना माहीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 31 डिसेंबर 2019 रोजी कोविड अलर्ट जारी केला आणि देशाच्या सीमा सील करण्याचे आवाहन केलं होतं. राहुल गांधी, सोनिया गांधी यांनीही इशारा दिला पण भाजप सरकारने त्यांची खिल्ली उडवली. पण गुजरातमधील भाजप सरकार नमस्ते ट्रम्प करण्यात मस्त होते, कोविड आला त्यावेळी टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवण्यास सांगितले. ताट वाजवले तर घरात गरिबी येते असे म्हणतात. भाजपने टाळ्या वाजवून देशात गरिबी आणली. रेल्वे बंद, बस बंद, विमान सेवा बंद केली आणि हजारो किलोमीटर लोकांना पायपीट करावी लागली. त्यात शेकडो लोक मरण पावले. त्यातही भाजपने हिंदू-मुस्लीम राजकारण केले. कोविडमध्ये मोदी सरकारने जनतेला सुविधा दिल्या नाहीत, असा आरोपही पटोलेंनी केला.

विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर सरकार म्हणून राज्याच्या प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. हे जनतेचे प्रश्न आहेत. तीन आठवड्यांच्या या अधिवेशनात विरोधकांना पूर्ण वेळ मिळाला नाही ही खंत आहे, असंही पटोले म्हणाले.

Tags

follow us