Download App

Nana Patole यांची उचलबांगडी निश्चित : काँग्रेसचे 2 ‘चाणक्य’ प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत

Maharashtra Congress News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात एका गटाची नाराजी वाढली असून लवकरच काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही आपण गटनेतेपदावर राहण्यास इच्छूक नसल्यांच पक्षश्रेष्ठींना कळवल्याने त्यांच्या जागी लवकरच नवा गटनेता नेमला जाणार असल्याची माहिती आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. नाना पटोले यांना पक्षांतर्गत विरोध वाढल्यानंतर त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेतली जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडे पटोले यांची तक्रार केली होती. त्यानंतर आता विदर्भातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर (Vijay Vadettivar), सुनील केदार (Sunil Kedar) आणि शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe) यांनी पटोलेंना पदावरुन दूर करण्यासाठी दिल्लीत तळ ठोकला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरुन गच्छंती होणार हे नक्की झाले आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीमुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष असून तो आता उघडपणे बाहेर आला आहे. त्यामुळे पटोले यांच्या जागी सर्वांना मान्य असेल आणि आगामी निवडुकांच्या दृष्टीने नेते आणि पदाधिकाऱ्यांना जोडून ठेवू शकेल, असं नेतृत्व महाराष्ट काँग्रेसला देण्यासाठई पक्षश्रेष्ठींकडून हालचाली सुरु असल्यांचे बोललं जात आहे.

‘जे सोडून गेले त्यांना पुन्हा घेणार का?’ राऊतांनी सांगितला उद्धव ठाकरेंचा निर्णय

प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत कोण आघाडीवर?
प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सतेज पाटील, सुनिल केदार, यशोमती ठाकूर यांच्या नावाच समावेश आहे. मात्र या स्पर्धेत सध्या तरी सुनिल केदार आणि सतेज पाटील यांची नावे सगळ्यात पुढे असल्याचे समजते. सुनिल केदार विदर्भातील काँग्रेसचा मोठ चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या गृहजिल्ह्यात मोठा धक्का दिला होता. नागपूर जिल्हा परिषदेची सत्ता भाजपकडून पुन्हा मिळवली होती. तसेच जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये काँग्रेसने चांगले प्रदर्शन केले होते. सावनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. स्थानिक राजकारणावर पकड आणि प्रदेश पातळीवर कामाचा अनुभव या सुनिल केदार यांच्या जमेच्या बाचू आहेत.

सतेज पाटील यांना पश्चिम महाराष्ट्रातील आक्रमक आणि मुत्सद्दी नेता म्हणून पाहिले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दहापैकी चार आमदार निवडून आणले होते तसेच पुणे शिक्षक मतदार संघातून प्रा. जयंत आसगावकर यांच्या विजयाने त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीवर शिक्कामोर्तब झाले. ज्यावेळी काँग्रेस हरत होती त्यावेळी पाटील काँग्रेसला विजयी करत होते. पुढील दीड वर्षात नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अशा स्थितीत प्रादेशिक आणि जातीय समीकरणे पाहता सतेज पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

पुण्याचा जागेवर राष्ट्रवादीने ‘अधिकृतपणे’ ठोकला दावा; अजित पवार म्हणाले, हो आम्ही इच्छूक!

महाराष्ट्र काँग्रेसला नवे प्रभारी मिळणार
महाराष्ट्र काँग्रेसचे सध्याचे प्रभारी एच. के. पाटील हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. कारण कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पाटील हे आमदार म्हणून निवडून आले असून त्यांचा राज्य मंत्रिमंडळातही समावेश केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केरळमधील रमेश चेन्निथला यांची महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून निवड होऊ शकते.

Tags

follow us