मुंबई : राज्याच्या राजकारणात नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती झाली. एकीकडे ही युती झाली मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये तसेच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये शीतयुद्ध निर्माण झाले आहे. यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) चिंतेत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे. तसेच पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. असे पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
त्यांच्या चर्चेत आम्ही नव्हतो
शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती झाली. तत्पूर्वी ठाकरे गट आणि वंचित यांच्यात चर्चा देखील झाली. मात्र या चर्चेत आम्ही कुठे नव्हतो. आमच्या ज्या चर्चा झाल्या त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावं अशी आमची मानसिकता आहे. तसेच पुढील निर्णयांबाबत संवाद सुरू आहे, असं पवार यांनी सांगितलं.
कोण काय बोलत याकडे मी लक्ष देत नाही
प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत, मी असतो तर तेच केलं असतं. यावर शरद पवार म्हणाले, कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. पण आमचा अनुभव आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे.
इतरांनी मला सल्ला देऊ नये…
शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, असे खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. पवारांवरील वक्तव्यामुळे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेत आंबेडकरांवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून मला सल्ला देणारे संजय राऊत कोण? माझी युती शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी झाली आहे. त्यांचा सल्ला मी ऐकेल. पण इतर कुणी मला सल्ला देऊ नये, अशा शब्दात आंबेडकरांनी संजय राऊतांचे कान टोचले.