Download App

पंकजा मुंडेंचा आक्रमक बाणा, खडसेंशी चर्चा; ऐन पावसाळ्यात मराठवाड्याचं राजकारण तापणार?

बीड : एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे. राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते. या दोन्ही नेत्यांचे पक्ष वेगळे, राजकारणाचे भाग वेगळे, राजकारणाच्या पद्धती वेगळ्या. पण या दोघांमध्ये एक समान धागा तो म्हणजे भाजपवरील नाराजी. एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज असलेले आणि पक्ष सोडलेले नेते. तर पंकजा मुंडे भाजपवर नाराज असलेल्या पण सध्या संयम धरुन पक्षातच राहिलेल्या नेत्या. (NCP Leader Eknath Khadse Meet BJP Leader Pankaja Munde and Pritam Munde)

आज याच दोन्ही नेत्यांची दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी भेट झाली. परळी येथील पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिनी खडसे या होत्या. तर पंकजा मुंडेंसोबत त्यांची बहिण आणि खासदार डॉ. प्रितम मुंडेे उपस्थित होत्या. गोपीनाथ मुंडे साहेबांना आदरांजली वाहिली व जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंडे भगिनींनी खडसेंचे आदरपूर्वक स्वागत केलं. प्रितम मुंडे यांनी रोहिनी खडसे यांची अत्यंत जिव्हाळ्याने गळाभेट घेऊन स्वागत केलं. दोन्ही कुटुंबातील हे स्नेह महाराष्ट्राला अनेक दिवसांनंतर अनुभवायला मिळाले.

यावेळी एकनाथ खडसे आणि रोहिनी खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहली. तसंच अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचं सांगितलं. स्व. गोपिनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करतांना आज त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी मनात दाटून आल्या, अशा भावना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल्या. या सस्नेह भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे ही भेट मराठवाड्याचं राजकारण बदलणारी ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरतं.

पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज?

मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे बोलून दाखविली आहे. यामुळे त्या राष्ट्रवादी किंवा रासपमध्ये जाऊ शकतात असं बोललं जातं. नुकतंच एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मी भाजपमध्ये आहे, भाजप माझा पक्ष थोडीच आहे, असं वक्तव्य केलं होतं. तसंच वडिलांसोबत भांडण झालं तर भावाच्या घरीही जाऊ शकते, असं सूचक वक्तव्य करत त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे इशाराही दिला होता. अशातच आज एकनाथ खडसे यांनी मुंडेंची भेट घेतल्यानंतर त्या भाजप सोडणार का? असा सवाल विचारला जात आहे.

राजकीय चर्चांचे दावे फेटाळले :

दरम्यान, या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे दावे दोन्ही नेत्यांनी फेटाळून लावले. या भेटीवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आजच्या दिवशी मला शून्य राजकारण दिसतं. मी कोणत्याही राजकीय नेत्याला बोलावलं नाही. इथं आलेला प्रत्येक जण मुंडे साहेबांच्या प्रेमासाठी आला आहे. तर या भेटीवर बोलताना एकनाथ खडसे यांनी आजच्या या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे.

Tags

follow us