‘वाचाळवीरांवर कारवाई करा, नाहीतर टीकेसाठीच आमदारकी दिल्याचं जाहीर करा’, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना(Devendra Fadnvis) इशाराच दिला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,(Sharad Pawar) खासदार सुप्रिया सुळे,(Supriya Sule) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर खालच्या पातळीची भाषा वापरत टीका केल्याचं दिसून आलं. त्यावरुन आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पडळकरांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भातील ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात.
उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांनी समज द्यायला हवी, अन्यथा टीका…— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 18, 2023
आमदार पवार ट्विटमध्ये म्हणाले, “राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात. उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांनी समज द्यायला हवी, अन्यथा टीका करण्यासाठीच अशा वाचाळवीरांना आमदारकी दिली हे जाहीर करावं, कुठल्याही पक्षाचे नेते असोत त्यांच्यावर टीका टिप्पणी करताना सर्व पक्षांनी महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का बसणार याची काळजी घायलाच हवी,” असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
नार्वेकर अन् शिंदे गट बॅकफूटवर; ठाकरे गटाला दिलासा : सर्वोच्च न्यायालयात काय काय घडलं?
सध्या राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अहमदनगरसह सोलापूर जिल्ह्यातील धनगर आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरच बोलताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबियांवर खालच्या पातळीची भाषा वापरत टीका केली आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लबाड लांडग्याचं पिल्लू आहे, त्यामुळे ते धनगर समाजाची आरक्षणाची मागणी मान्य करणार नसल्याचं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं.
सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्यांनी विध्वंस सुरू केला, मोहन भागवत यांचं मोठं विधान
गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यभरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनीही या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून गोपीचंद पडळकरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सुनिल तटकरेंनंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही गोपीचंद पडळकरांचा समाचार घेतला असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे, जर मागणी केली नाहीतर टीका करण्यासाठीच आमदारकी दिल्याचं जाहीर करावं, असंही ते म्हणाले आहेत. आता देवेंद्र फडणवीस गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर नेमकी कोणती भूमिका घेतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.