Download App

NCP : पवारांचा सेफ गेम! चव्हाणांना पाठिंबा देत अजितदादांच्या खांद्यावर ठेवली बंदूक

NCP President Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची निवड केली आहे. हे दोन्ही कार्यकारी अध्यक्ष आता पक्षाचे प्रमुख या नात्याने काम करणार आहेत. याशिवाय सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, डॉ. योगेंद्र शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. मोहम्मद फैजल अशा नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करत त्यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. (NCP President Sharad Pawar Said Supriya Sule is elected as Executive President on the proposal of Ajit Pawar)

मात्र या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावं नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्यकारी अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेनंतर बैठक संपताच अजित पवार तातडीने उठून निघून गेले. यामुळे देखील पवार नाराज आहेत का? असा सवाल विचाराला जात आहे. मात्र अजित पवार यांच्या प्रस्तावानेच सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असा खुलासा करत खासदार वंदना चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटाला पवार यांनी एकप्रकारे त्यांनी दुजोरा दिला.

काय म्हणाले शरद पवार?

आगामी निवडणुकांना एक वर्ष शिल्लक आहे. आम्ही सगळे एकाच ठिकाणी पोहचू शकत नाही. एक कार्यकारी अध्यक्ष देखील एकावेळी सर्व ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे मागील महिन्यांभरापासून आम्ही देशाच्या आकाराचा विचार करता एक नाही तर दोन कार्यकारी अध्यक्ष असावेत असा निर्णय घेतला. राहिला प्रश्न सुळे आणि पटेल यांच्या निवडीचा. तर याबाबत लोकांची मागणी होती की पटेल आणि सुळेंकडे जबाबदारी द्यावी. त्यानुसारच निर्णय झाला आहे. असं पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार नाराज आहेत वगैरे यात एका पैशाची पण सत्यता नाही. जयंत पाटील सध्या राज्यात प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे जबाबदारी आहे. अजित पवार हे महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडेही जबाबदारी आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे विशेष अशी कोणतीही जबाबदारी नव्हती. ते जबाबदारी स्विकारण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी उपलब्ध होते. पण यावरुन कोणी नाराज आहे या गोष्टीत काहीही तथ्य नाही. मागच्या एका महिन्यापासून सर्वच वरिष्ठ नेत्यांनी या दोघांची नावं आमच्यापुढे ठेवली होती. यात सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष बनवण्याचं मत सर्वप्रथम अजित पवार यांनीच व्यक्त केलं होतं. त्याबाबतचा निर्णय आज झाला.

वंदना चव्हाण काय म्हणाल्या होत्या?

राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या की, ज्यावेळी शरद पवारांनी राजीनामा दिला होता. यानंतर काय असा प्रश्न विचारला जात होता. साहेबांनी राजीनामा मागे न घेतल्यास काय कारायचं? त्यावेळी अजित पावारांनीच सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात यावं यासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता, असा मोठा गौप्यस्फोट केला. आता याच गौप्यस्फोटाला पवार यांनी दुजोरा दिला आहे.

Tags

follow us