मुंबईः जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना घेरले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे लाठीचार्जबाबत माफी मागितली होती. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. नुसती जाहीर माफी मागून प्रश्न सुटणार नाही. या मागच्या वेदनाही समजून घेतल्या पाहिजेत, असे खासदार सुळे म्हणाल्या.
लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. त्या पद्धतीने राज्य सरकारनेही विशेष अधिवेशन बोलवावे. त्यात मराठा, मुस्लिम, लिंगायत, धनगर आरक्षणाबाबत चर्चा तर करावीच. त्याचबरोबर दुष्काळ, महागाई, बेरोजगारीवरही चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे म्हणाले, चार समाजांची आरक्षणाची मागणी आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख केला होता. राज्यात व केंद्रात त्यांची सत्ता आहे. गेल्या नऊ वर्षांत केवळ अडीच वर्ष आमची सत्ता होती. भाजपला सात वर्ष सत्ता मिळालेली आहे. आमची सत्ता असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. त्यानंतर काय घडले असा सवालही सुळेंनी उपस्थित केला आहे.
राज्यात चांगले निर्णय होत नाहीत. पॉलिसी पॅरेलिसिस झाला आहे. महाराष्ट्र शिक्षण, आरोग्य सुविधेमध्ये कमी पडला असल्याचा आरोपही सुळे यांनी केला आहे. शुक्रवारच्या बैठकीला तिन्ही पक्ष नव्हते. तुम्ही ट्रिपल इंजिनचे सरकार असे म्हणता. पण थर्ड इंजिन बैठकीला का नव्हते. नाराजी आहे की पॉलिसी पॅरालिसिस झाला आहे, असा हल्लाबोल सुळे यांनी सरकारवर केला आहे.
आमचा पक्ष फुटलेला नाही
शरद पवार व अजित पवार गटाला पक्ष व चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने नोटीस बजाविली आहे. या नोटीसाला दोन्ही गटाने उत्तर दिले आहेत. आमचा पक्ष फुटलेला नाही. शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष असून, जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत, याचा पुर्नउच्चार पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.