Download App

एकट्या सत्यजीतने नाही; मामा आणि वडिलांनीही काँग्रेसला झटका दिला होता…

  • Written By: Last Updated:

(अशोक परुडे यांजकडून)

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसमधील मोठा ड्रामा पाहायला मिळाला. या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. सुधीर तांबे हे अर्ज भरण्यासाठी नाशिकला गेले. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सत्यजीत होता. अचानक सुधीर तांबे यांनी माघार घेतली. तर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरून काँग्रेसमधला अंतर्गत संघर्षसमोर आला.

त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही सुधीर तांबेंना उमेदवारी दिली होती, असे सांगितले. तसेच याबाबत पक्षस्तरावर चर्चा होणार आहे. परंतु पक्षाविरोधात सत्यजीत तांबे यांनीच नाही, तर त्यांचे मामा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, वडिल सुधीर तांबे यांनीही बंडखोरी केली होती. त्यात ते यशस्वी झाले होते. तशीच परिस्थिती सत्यजीत तांबेंनी तयार केली आहे.

थोरातांनी कसे बंड केले होते, यासाठी आपल्याला तब्बल चार दशके मागे जावे लागेल. 1985 मध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांचे वडिल, ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक भाऊसाहेब थोरात, माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्यामध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू होता. त्यावेळी पक्षाने दोघांना टाळले आणि पुणे जिल्ह्यातील शंकुतला थोरात यांना उमेदवारी दिली. भाऊसाहेब थोरात हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता होती. त्यांच्या कार्यकर्त्यांची तशीच इच्छा होती. मात्र भाऊसाहेबांनी पक्षाच्याविरोधात निवडणूक लढण्याचे टाळले.अखेरीस त्यांचे पुत्र बाळासाहेब थोरात हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि निवडून आले. त्यानंतर पुन्हा पक्षात आले. त्यानंतर आतापर्यंत थोरातच या मतदारसंघातून निवडून येत आहत. केवळ तेच नाही, त्यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधरमधून पक्षाविरोधात बंड करून निवडून आले होते. २००९ मध्ये तत्कालीन आमदार प्रतापदादा सोनवणे हे धुळे मतदारसंघातून विजयी झाले होते. त्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून अॅड. नितीन ठाकरे अधिकृत उमेदवार होते. त्यांचा व भाजपचे उमेदवार डॉ. प्रसाद हिरे यांचा तांबेंनी पराभव केला. त्यानंतर ते पुन्हा पक्षात येऊन सलग दोनदा निवडून आले होते.

आता दोनदा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविणारे सत्यजीत तांबे यांचाही प्रवास तसाच सुरू झाला आहे. त्यात फरक एेवढाच की वडिलांनी पक्षाकडून उमेदवारी मिळाली. पण त्यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्याएेवजी सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार झाले आहेत. त्यात नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे हे आमचे अधिकृत उमेदवार नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे मामा बाळासाहेब थोरात सारखेत भाचा सत्यजित तांबे यांनी पक्षाला झटका दिला आहे.

Tags

follow us