धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Niimbalkar) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र मोठी टीका होत आहे. ते आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, केवळ प्रतिमा सांभाळायला किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी हा निर्णय घेतला नाही. माझ्या वडिलांच्या हत्येच्या केसच्या बाबतीत जर मला न्याय मिळत नसेल, तर यापेक्षा दुसरे दुर्दैव काय? असा संतप्त आणि भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर महायुतीत आल्यानंतर राणा जगजितसिंह पाटील कुटुंबाकडून होत असलेल्या स्वागतावर आणि प्रचाराच्या भूमिकेवर बोलताना, ‘मला त्या कुटुंबाचे एक मतही नको, मी स्वतः सक्षम आहे. कै. पवनराजे निंबाळकर साहेबांना मानणारी सर्वसामान्य माणसं माझ्यासाठी समर्थ आहेत, असं सांगत त्यांनी जुना कौटुंबिक आणि राजकीय वाद अजूनही कायम असल्याचं स्पष्ट केलं.
ज्या दिवशी धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडत होती, त्याच वेळी ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कामांसाठी हतबल होऊन हा निर्णय घेतल्याचं ठामपणे सांगितलं आहे. मी धाराशिवकरांच्या विकासासाठी मी शिवसेनेमध्ये गेलो आहे असंही पुढे ओमराजेंनी म्हटलं आहे.
२०२३-२४ पासून मतदार संघातील शेतकरी एका ट्रान्सफॉर्मरसाठी इस्टिमेट तयार करून माझ्याकडे येत होते. शेतकऱ्याची माफक अपेक्षा असते की वीज पुरवठा सुरळीत मिळावा आणि शेतातील मोटार चालावी. मात्र, विरोधी आणि सत्ताधारी यांच्यातील राजकीय तुलनेमुळे तो निधी मला त्या शेतकऱ्याला देता येत नव्हता. केवळ मी विरोधात आहे म्हणून शेतकऱ्याच्या ट्रान्सफॉर्मरसाठी निधी देऊ शकत नव्हतो. हा त्याच्यावर अन्याय होता आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझी हतबलता होती असंही ते म्हणाले.
भाई उद्धवराव पाटील यांनी एकेकाळी मुख्यमंत्रीपद नाकारले होते, मग तुम्ही सत्तेसाठी गेलात का? यावर उत्तर देताना ओमराजे म्हणाले, पुरातन काळातील उदाहरणे काढून आज वागायचे म्हटले, तर सगळी तत्व पाळणारा, प्रामाणिकपणे काम करणारा माणूस इथे टिकेल का? आम्ही आजपर्यंत त्यांचेच आचरण केले, पण आम्हाला त्याचे फळ काय मिळाले? आमची एकही पंचायत समिती नाही, एकही नगरपालिका नाही.
सोमनाथ आप्पांसारखा निष्ठावंत माणूस विचारा, तो बिनकामाचा होता का? पण त्यांचा पराभव तिसऱ्या क्रमांकावर जाऊन झाला. लोकच आम्हाला म्हणत होते की तुमच्याकडे सत्ता नाही, मग तुम्हाला पंचायत समिती मेंबर किंवा नगरसेवक निवडून देऊन काय करायचं? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांचा झालेला हा दारूण पराभव जिवारी लागणारा होता. जनभावना सत्तेच्या बाजूने होती आणि तोच संदेश मानून मी हा निर्णय घेतला. हे कलियुग आहे.
गेली पाच वर्षे विरोधात असताना अचानक सत्तेत जाण्याचा ‘ट्रिगर पॉईंट’ काय होता? यावर बोलताना ओमराजे म्हणाले, आमच्याकडे एकही पंचायत समिती नाही, एकही नगरपालिका नाही. सोमनाथ आप्पांसारखा निष्ठावंत माणूस तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पराभूत झाला. लोकांनीच आम्हाला सांगितले की तुमच्याकडे सत्ता नाही, मग तुम्हाला निवडून देऊन काय करायचे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निष्ठावंत उमेदवारांचा झालेला हा दारूण पराभव जिवारी लागणारा होता. जनभावना सत्तेच्या बाजूने होती आणि तोच संदेश मानून मी हा निर्णय घेतला.
भावाला बँक घोटाळ्यातून वाचवण्यासाठी किंवा ईडीच्या दबावामुळे पक्षांतर केले, या संजय राऊत यांच्या टीकेचा त्यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. कुठं आली होती नोटीस? दाखवा ना मला एक नोटीस कुठल्या विभागाने काढली होती? मी कुठल्याच प्रकारच्या दबावाला थारा न देणारा माणूस आहे. तसं असते तर २०२२ ते २०२६ पर्यंत चार वर्षे सरकारने माझी वाट पाहिली असती का? चार वर्षे माझे नुकसान का करून घेतलं असते? मतदारसंघातील लोकांना माहित आहे की माझी प्राथमिकता पैसा किंवा पद नाही.
मी जाहीरपणे सांगतो, मला मंत्रिपदाची कोणतीही अट किंवा अपेक्षा नाही, मला ते दिले तरी नको आहे. मतदारसंघावरचा मागासलेपणाचा शिक्का पुसण्यासाठी केंद्र आणि राज्याने मदत करावी, एवढीच माफक अपेक्षा आहे. मला तेरणा आणि मांजरा नदीवरचे बॅरेजेस पूर्ण करायचे आहेत आणि कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करून निधी मिळवायचा आहे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करेन.
उद्धव ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या शिवसेनेबद्दल आपण कधीही वाईट बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. शिवसैनिक माझ्यावर प्रेम करतात, हा रोष नाही. मी त्यांच्या कामाला अर्ध्या रात्री धावून जाणारा माणूस आहे. या दरम्यानच्या काळात आलेल्या सर्व फोन कॉल्सना मी स्वतः परत कॉल बॅक करून काही शिवसैनिकांशी अर्धा-अर्धा तास तर काहींशी २५-२५ मिनिटे बोलून माझी बाजू पटवून दिली आहे.
पक्षांतराच्या बदल्यात मिळालेल्या निधीवरून होणाऱ्या ‘ब्लॅकमेल’च्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, “याला तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा, पण माझी प्राथमिकता मतदारसंघातील लोकांबद्दल आहे. लोकांना वाटते ओमराजेला भरघोस निधी मिळाला, पण हा निधी माझ्या वैयक्तिक कामासाठी मिळालेला नाही. धाराशीवच्या आठवडी बाजाराचा निधी २०२२ पासून स्थगित होता, तो आता ८ कोटी रुपये मिळणार आहे. तसेच शहरात लहान लेकरांना घेऊन जाण्यासाठी एकही उद्यान नव्हते, आता छत्रपती संभाजी उद्यान, मासाहेब जिजामाता उद्यान आणि हिंदूदहृयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी १८ कोटींचा निधी मिळाला आहे.”
शेवटी, मशाल चिन्हावर निवडून येऊन बंडखोरी केल्याच्या टीकेवर बोलताना त्यांनी थेट २०२९ चे आव्हान दिलं. २०१९ ला मी मोदी लाटेत निवडून आलो अशी टीका झाली. २०२४ ला मी लोकांना आवाहन केलं की, माझं काम असेल तर एक तरी मताने जास्ती निवडून द्या लोकांनी मला ३ लाख २९ हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून दिलं. निवडणुकीत ज्या ज्या घटकांनी मदत केली, त्या सर्वांचे मत आणि मदत मी नाकारत नाही, १००% माझ्यामुळेच विजय झाला असं मी म्हणणार नाही. पण जर मी लोकांची कामे करू शकत नसेल, तर निर्णय घेण्यात काही गैर नाही. आता आपल्या कामाला पडणारा खासदार आहे हे लोकांना वाटले, तर २०२९ ला मी पुन्हा तसं आवाहन जनतेला करेन. माझा निर्णय लोकांच्या मतातून दिसेल आणि तो मी २०२९ ला सिद्ध करून दाखवेन, असा विश्वास ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.
