Download App

परभणीत महायुतीतील तिन्ही पक्षांच्या दंड-बैठका… जागा राखण्याचे ठाकरे गटापुढे आव्हान!

परभणी लोकसभा मतदारसंघ. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेला (Shiv Sena) असलेला विजयाचा आशीर्वाद पण त्याच जोडीला लाभलेला पक्षांतराचा शाप, असे दोन शब्दात परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Lok Sabha) वर्णन करता येईल. पण संजय जाधव यांनी हा शाप धुवून काढला आणि शिवसेनेला पवित्र करत भगवा या मतदारसंघात फडकविता ठेवला. आता पुन्हा एकदा संजय जाधव (Sanjay Jadhav) लोकसभा गाठण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण त्यांच्यापुढे भाजप, विभागलेली शिवसेना आणि विभागलेली राष्ट्रवादी (NCP) अशा तिन्ही पक्षांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या जाधव यांना यंदाची लोकसभा काहीसा अवघड पेपर असल्याचे बोलले जात आहे.

नेमकी काय आहेत परभणी लोकसभा मतदारसंघातील समीकरणे? पाहुया.

परभणी लोकसभा मतदारसंघाची रचना :

परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील चार आणि जालना जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. यात परभणी जिल्ह्यातले जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी हे चार तर परतूर आणि घनसावंगी या जालना जिल्ह्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. सध्या यात जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर आणि परतूरमध्ये बबनराव लोणीकर हे भाजपचे आमदार आहेत. गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, परभणीमध्ये ठाकरे गटाचे राहुल पाटील, पाथरीमध्ये काँग्रेसचे सुरेश वरपूडकर आणि घनसावंगीमध्ये शरद पवार गटाचे राजेश टोपे आमदार आहेत.

परभणीमध्ये सर्वपक्षीयांची ताकद असली तरीही लोकसभा मतदारसंघावर मागील तीन दशकांपासून शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. काँग्रेस आणि शेकापचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ 1989 मध्ये मराठवाड्यातील भावनिक वातावरणाचा फायदा घेत शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे घेतला. अशोक देशमुख यांच्या रुपाने शिवसेनेचा या मतदारसंघातील पहिला खासदार लोकसभेत देला. 1991 ला पुन्हा अशोक देशमुख विजयी झाले. पण त्यांच्या पक्षांतरानंतर 1996 ला सुरेश जाधव निवडून आले. 1998 ला काँग्रेसच्य सुरेश वरपुडकर यांनी विजय मिळविला. पण त्यांना अवघ्या वर्षभराचा कालावधी मिळाला.

लालू यादवांचा मोठा डाव : सत्ता कायम ठेवण्यासाठी थेट भाजपच्या मित्रपक्षालाच उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

त्यानंतर 1999 मध्ये शिवसेनेने पुन्हा हा मतदारसंघ ताब्यात घेतला. 1999 ला पुन्हा सुरेश जाधव, 2004 ला तुकाराम रेंगे पाटील, 2009 ला अशोक दुधगांवकर यांनी या मतदारसंघातून विजय मिळविला. मात्र या खासदारांनी देखील निवडणुकांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवत शिवसेना सोडली. या चौघांनीही इतर पक्षांतून नशीब आजमावले. पण त्यांना एकदाही यश आले नाही. पण या पक्षांतराला वैतागून उद्धव ठाकरे यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भर सभेत संजय जाधव यांना निवडून आल्यानंतर पक्षांतर न करण्याची शपथ घ्यायला लावली होती. त्यांनी ही शपथ 2019 आणि 2022 अशा दोन्हीवेळा सार्थ ठरवली आणि ठाकरेंचा भगवा जिल्ह्यात कायम राखला. आता यंदाही आपणच एकमेव उमेदवार असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

पण संजय जाधव यांच्यापुढे भाजप, विभागलेली शिवसेना आणि विभागलेली राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांचे आव्हान असणार आहे. भाजपकडून इथून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेल्या केदार खटिंग यांनीही लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. यासोबतच परतूरचे भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे सुपुत्र आणि भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनीही पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढविण्यासाठी तयार आहोत असे सांगितले आहे.

पण भाजपच्या इच्छुकांना ही जागा शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या पारड्यात पडणार की नाही, याची चिंता सतावत आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी हा मतदारसंघ शिवसेनाच लढविणार असल्याचे ठासून सांगितले आहे. त्यांचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तरीही शिवसेनेने परभणी मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. त्याचवेळी राष्ट्रवादीनेही इथला दावा कायम ठेवला आहे. आघाडीच्या जागावाटपात परभणी लोकसभा सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच आहे. परंतु राष्ट्रवादीला आतापर्यंत याठिकाणी यश आलेले नाही.

मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह बाजार समित्यांवर राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. जिंतूर तालुक्यातील दोन्ही बाजार समित्यांसह पाथरी आणि सोनपेठ या भागातील बाजार समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. परभणीची बाजार समितीही काँग्रेसकडे आहे. याशिवाय महाविकास आघाडीच्या काळात इथले पालकमंत्रीपदही राष्ट्रवादीकडेच होते. 1999 पासून आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने दोन नंबरची मते घेतली आहेत. गत दोन निवडणुकांमध्ये तर साडे चार लाखांहून अधिक मते राष्ट्रवादीने घेतली होती. यंदाही आमदार बाबाजाणी दुर्रानी यांनी इथून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच इथला उमेदवार असणार असा दावा केला आहे. राष्ट्रवादीकडून इथे राजेश विटेकर यांच्या नावाची चर्चा आहे.

शिवसेनेत कमालीची अंतर्गत धुसफूस

मतदारसंघात दबक्या आवाज शिवसेनेबद्दल कमालीची नाराजी आहे. शिवसेना नेतृत्वाने परभणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सातत्याने केला जातो. मागील 30 वर्षे या मतदारसंघातून खासदार निवडून येत असूनही शिवसेनेने कधीही मोठ्या पदांवर किंवा मंत्रिपदासाठी परभणीला कधीही संधी दिली नाही याची खदखद स्थानिक नेतृत्वामध्ये असल्याचे सांगितले जाते. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर परभणीतले शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्यांना डावलण्यात आले.

याशिवाय, परभणीचे पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळेल, मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नसताना इथले पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले होते.राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद गेल्यानंतर खासदार जाधव यांच्यासह परभणीच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पक्षाची गळचेपी होत असल्याचे म्हटले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय सदस्य नियुक्त करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली होती. इथे राष्ट्रवादीचा खासदार, आमदार नसतानाही त्यांना संधी देण्यात आल्याचा आरोप करत संजय जाधव नाराज झाले होते.

भाजपसाठी सर्वात सेफ मतदारसंघ; पण सलग दोनवेळा विक्रमी मतांनी निवडून आलेला खासदारही आहे गॅसवर

परभणीला वैद्यकीय महाविद्यालय द्यावे अशीही मागणी स्थानिक शिवसेना नेत्यांकडून करण्यात आली होती. पण धुळे, उस्मानाबाद, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय असताना परभणीला मात्र उपेक्षित ठेवण्यात आल्याची भावना होती. याच नाराजीतून त्यांनी त्यांचा राजीनामाही दिला होता.आताही खासदार जाधव आणि आमदार पाटील उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले आहेत. पण त्यांना पक्षात मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी देण्यात आली नसल्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे ही नाराजी ठाकरे गट कशी दूर करणार आणि जागा कायम ठेवण्यात यश मिळविणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us