Download App

Prakash Singh Badal : म्हणून प्रकाश सिंहांनी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार परत केला

Sardar Prakash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे मंगळवारी निधन झाले. बादल हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना मोहालीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 25 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तब्बल पाच वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. बादल यांना भारत सरकारच्या वतीने पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. दरम्यान केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला होता. चला तर मग अशा या राजकारणातील सिंह असलेल्या या ज्येष्ठ नेत्याची राजकीय कारकीर्द जाणून घेऊ.

पाचवेळा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली
प्रकाश सिंह बादल हे 1970 ते 1971 आणि पुन्हा 1977 ते 1980 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. यानंतर ते 1997 ते 2002 आणि 2007 ते 2017 पर्यंत पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते. 2015 मध्ये प्रकाश सिंह बादल यांना भारत सरकारच्या वतीने पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. दरम्यान सिंह हे 1995 ते 2008 पर्यंत ते पक्षाचे अध्यक्ष होते. आणि आता त्यांचे पुत्र सुखबीर सिंह बादल हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.

म्हणून ‘पद्मविभूषण’ पुरस्कार परत केला
पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ पद्मविभूषण पुरस्कार परत केला.

राजकीय कारकीर्द
प्रकाश सिंह बादल यांनी 1947 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पंजाबच्या राजकारणात येण्यापूर्वी ते बादल गावचे सरपंच आणि नंतर लोंगी ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष होते. 1957 मध्ये त्यांनी शिरोमणी अकाली दलाच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. यानंतर 1969 मध्ये ते पुन्हा निवडून आले. यादरम्यान त्यांनी सामुदायिक विकास, पंचायती राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून काम पाहिले.

सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून ओळख
सिंह यांनी पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1970 मध्ये ते सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. प्रकाश सिंह बादल यांनीही विरोधी पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1972, 1980 आणि 2002 मध्ये ते विरोधी पक्षनेते होते. एवढेच नाही तर मोरारजी देसाई पंतप्रधान असताना ते खासदार म्हणूनही निवडून आले होते.

बादल यांचे वैयक्तिक जीवन
प्रकाश सिंह बादल यांनी 1959 मध्ये सुरिंदर कौर यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलाचे नाव सुखबीर सिंह बादल आणि मुलीचे नाव प्रनीत कौर आहे. बादल यांची पत्नी सुरिंदर कौर यांचे २०११ मध्ये कर्करोगामुळे दीर्घ आजाराने निधन झाले.

Tags

follow us