Download App

Parth pawar : ‘त्यांना स्वातंत्र्य आहे’, पार्थ पवारांवर सुनेत्रा पवार थेट बोलल्या…

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar )  यांचे चिरंजीव पार्थ पवार ( Parth Pawar )  यांनी 2019 साली मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. तेव्हापासून पार्थ पवार हे राजकारणात फारसे सक्रीय दिसत नाहीत. पार्थ पवारांवर त्यांच्या आई सुनेत्राताई पवार ( Sunetra Pawar )  यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुनेत्राताईंना पार्थ पवार हे पुन्हा राजकारणात सक्रीय होणार का?, असा प्रश्न एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, आमच्या घरात प्रत्येकाला विचार करण्याचे व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय ते स्वत: घेतील असे त्यांनी सांगितले आहे.

पार्थ पवारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांच्या या  भेटीनंतर पार्थ पवार नाराज असल्याचे भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले होते. रोहित पवारांकडे बारामती अ‍ॅग्रो ही कंपनी आहे. तसेच त्यांना महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष देखील केले आहे. यामुळे आजोबा आपल्यावर अन्याय करत असल्याची भावना पार्थ यांच्यात निर्माण झाली असेल, असे पडळकर म्हणाले होते.

दरम्यान सुनेत्राताईंना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने  ‘सावित्रीबाई फुले जीवन साधना गौरव पुरस्कार’  प्रदान केला आहे. शिक्षण आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.   त्यानिमित्ताने त्यांनी एका वृत्तवाहिनीली मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज