Prithviraj Chavan : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री होते. त्याकाळात दोन्ही पक्षांत धुसफूस वाढली होती. वादही समोर आले होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीवरील राग वेळोवेळी समोर आला आहे. आताही त्यांनी पुन्हा एकदा भुतकाळात घडलेल्या काही गोष्ट समोर आणत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात मला जेवढा बदल करता आला तेवढा मी केला. राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. त्याची मोठी राजकीय किंमत मला मोजावी लागली. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमचे सरकार पाडले असा खळबळजनक खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
पुण्यात आयोजित संसदरत्न खासदार राजीव सातव स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात चव्हाण यांच्या हस्ते राज्याचे साखर संचालक डॉ. संजयकमार भोसले यांना संसदरत्न खासदार राजीव सातव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार पाडलं नसतं तर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली नसती. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्नही तेव्हाच निकाली निघाला असता असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेच्या शिस्ताची देशभरात लौकिक होता. पण आता तशी शिस्त आज दिसत नाही. राज्याचा सहकार विभाग शिस्तीसाठी प्रसिद्ध नाही. यात आता मोठ्या बदलांची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे वक्तव्य केल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे. चव्हाणांच्या या आरोपांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्याला कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.