Rahuri Assembly Constituency Bye Election: राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. या पोटनिवडणुकीत म्हणावी तशी रस्सीखेच नाही. पण 1998 ला 28 वर्षांपूर्वी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक राज्यभर गाजली होती. कारण साखर सम्राटांच्या पट्ट्यात भाजपचा उमेदवार निवडून आला होता. चंद्रशेखर कदम अवघ्या 23 मतांनी निवडून आले होते. तेव्हा दोनवेळेस फेर मतमोजणी झाली होती आणि या मतमोजणीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. नेमकी या निवडणुकीचा थरार कसा होता हेच जाणून घेऊया…
1998 लोकसभेची निवडणूक जाहीर झाली होती. कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने राहुरीचे आमदार असलेले प्रसाद तनपुरे यांना उमेदवारी दिली. तत्कालीन भाजपचे खासदार भीमराव बडदे यांचा पराभव तनपुरे खासदार झाले. त्यामुळे तनपुरेंनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक लागली होती. तेव्हा राहुरी तालुका मिळून मतदारसंघ होता. भाजपने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे चंद्रशेखर कदम, काँग्रेसने रामदास पाटील धुमाळ ,जनता दलाने लक्ष्मण धागुडे यांना मैदानात उतरविले होते. इतर चार अपक्ष असे सात उमेदवार रिंगणात होते.
पोटनिवडणूक असल्याने 54 टक्केच मतदान झाले. परंतु मतमोजणीत जोरदार चूरस निर्माण झाली होती. अंतिम फेरीत कदम अवघ्या काही मतांनी पराभूत होतील, अशी परिस्थिती होती. तिकडे काँग्रेसच्या समर्थकांनी धुमाळ यांची विजयी मिरवणूक काढली होती. तिकडे कदम यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केल्याने पुन्हा मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या फेर मतमोजणीत कदम यांनी सोळा मतांनी आघाडी घेतली होती. या मतमोजणीमुळे दोन्ही उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे टेन्शन वाढले होते. प्रशासनवरही दबाव वाढला होता. त्यामुळे वाद सुरू झाले. त्यानंतर काँग्रेसचे धुमाळ यांनी फेरमतमोजणीची मागणी केली.
त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी विजयकुमार आणि धुमाळ यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दुसऱ्यांदा फेरमतमोजणी सुरू झाली. त्यावेळी मात्र वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे काही वेळ गोंधळ झाला. परंतु तो लगेच वीजपुरवठा सुरू झाला. दुसऱ्या फेरीत कदम यांना आणखी सात मते मिळाली. त्यामुळे 23 मतांनी कदम हे विजयी झाले होते. ही निवडणूक बॅलेटपेपरवर होती. त्यामुळे तब्बल चार हजार मते बाद करण्यात आली होती. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने ती मते पुन्हा मोजण्यात आली. त्याचा निकालावर परिणाम झाला होता. चंद्रशेखर कदम यांना 34523 तर रामदास पाटील धुमाळ यांना 34500 मते मिळाली. अपक्ष उमेदवार अॅड. पंढरीनाथ पवार यांना 15059 अशी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. या विजयामुळे साखर कारखानदारीच्या पट्ट्यातून निवडून येणारे भाजपचे पहिले आमदार म्हणून चंद्रशेखर कदम यांची नोंद झाली.
पवारांची न झालेली सभाही चर्चेत
काँग्रेसचे रामदास पाटील धुमाळ यांच्या प्रचारार्थ शरदचंद्र पवार यांची देवळाली प्रवरा येथे एक सभा नियोजित होती. देवळाली प्रवरा हे चंद्रशेखर कदम यांचे गाव होते. पण शरद पवारांची तिथे सभा झालीच नाही. हा एक चर्चेता मुद्दा राहिला आहे.
कदमांनी पराभवाचा बदला घेतला
1999 मध्ये प्रसाद तनपुरे यांनी पुन्हा विधानसभा लढवली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तनपुरे विरुद्ध भाजपचे कदम यांच्या लढत झाली. त्यात तनपुरे यांनी कदम यांचा 600 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर कदमांनी प्रसाद तनपुरे यांचा तब्बल दहा हजारांनी पराभव केला.
वयाच्या साठ वर्षानंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय चंद्रशेखर कदम यांनी घेतला. तो शब्द त्यांनी त्यांच्या मातोश्री आणि भाजपचे नेते सूर्यभान वहाडणे पाटील यांना दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला. कदम यांना भाजपने पुन्हा लोकसभेची उमेदवारी घेण्याबाबत विचारणा केली होती. परंतु त्याला त्यांनी नम्रपणे नकार दिला.
