मुंबई : शिवसेनेत बंड झाल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. तसेच मूळ शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. यानंतर अनेक आमदार खासदार शिंदे गटात सामील झाले. यातच ठाकरे गटाशी निष्ठावंत असलेले रामदास कदम हे शिंदे गटात सामील झाले व त्यांनतर ते सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधल्याचंही रामदास कदम म्हणाले आहेत.
मविआतील माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर कदम यांनी जोरदार टीका केली. शिवसेनेच्या फुटीला अनिल परब जबाबदार असून त्यांची ईडीकडून चौकशी व्हायलाच हवी. तसेच परब यांची जागा जेलमध्येच असल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझा मुलगा दापोलीत शिवसेनेचा विद्यमान आमदार असतानाही अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पडलेल्या माजी आमदाराला निधी देऊन शिवसेना आमदार योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा डाव खेळला होता, असा आरोपही रामदास कदमांनी केला आहे.
शिवसेनेत फुट पडून शिंदे गटाची निर्मिती झाल्यानंतर रामदास कदम यांनी ठाकरे गटातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर ते शिंदे गटात सामील झाले. तेव्हापासूनच सातत्यानं रामदास कदमांकडून ठाकरे आणि ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर टीकेची तोफ डागली जात आहे.