नागपूर : राज्याचे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. सध्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. यातच आता शिंदे गट आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक धक्कादायक आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात येत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी आज दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. यानंतर आमदार नितेश राणे यांनी देखील आक्रमक होत चौकशीची मागणी केली.
नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले. यामुळे दोन वेळा सभागृह तहकूब करण्यात आले. कोणाच्या राजकीय दबावामुळे दिशी सालियन प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला. तिच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले. ८ जूनच्या पार्टीत कोण कोण होतं, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. यानंतर पुन्हा एकदा सभागृह सुरु करण्यात आले. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी पुन्हा हा मुद्दा उचलुन धरला. त्यामुळे १५ मिनिटासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.
आज नागपूर विधानसभेत पत्रकारांशी बोलताना नितेश राणे यांनी हे प्रकरण पुन्हा उघडण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत आगामी काळात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात. दिशा सालियान आणि सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी, असं ते म्हणाले. दिशा सालियान मृत्यू प्रकरण अद्याप मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे, सीबीआय या प्रकरणाचा तपास करत नाही.
![8[1]](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2022/12/81-1-1024x576.png)