Sandipan Bhumre on Sanjay Raut : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे गट असे दोन गट ऩिर्माण झाले. आता या गोष्टीला एक वर्ष उललून गेलं, तरी दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. रोज दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. याला आता शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
आज माध्यमांशी बोलतांना भुमरेंना राऊतांनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असता ते म्हणाले की, संजय राऊत काय बोलतात, याला काही अर्थ नाही. ते कालच बोलले असं नाही. ते रोज सकाळी नऊ-साडेनऊ वाजता टीव्हीवर येऊन काहीतरी बरळत असतात. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही.
ते म्हणाले, मागच्या बारा महिन्यांत, आम्ही 36 सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा)काढल्या आहेत. मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त एक सुप्रमा काढण्यात आली होती. संजय राऊतांना हे विचारलं पाहिजे की, तुम्ही मागील सरकारच्या काळात का नाही सुप्रमा काढल्या? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंत सत्तेत आल्यानंतर त्यांनी सिंचन क्षेत्रासाठी मोठ काम केलं. शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. संजय राऊतांना विरोध करण्याशिवाय, दुसरं काही कामच नाही. सकाळी टीव्ही लावल्यावर त्या टीव्हीवर राऊत दिसतात. आणि आता राऊत दिसताच लोक चॅनेलही बदलू लागले आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीवर बोलतांना राऊतांनी जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, सरकारकडे पैसे आहेत कुठ? गेल्या 72 तासात त्यांच्या तिजोरीचा खर्च हा मंत्री, थाटमाट यावर खर्च होत आहे. मुख्यमंत्री आले आणि गेले. गणपती आले आणि नाचून गेले, तसाच काहीस प्रकार मंत्रिमंडळ बैठकीत झाला, अशी टीका राऊतांनी केली होती.
दरम्यान, राऊतांनी केलेल्या टीकेवर संदीपान भुमरेंनी राऊत दिसताच लोक चॅनेलही बदलू लागले अशी टीका केली. भुमरेंच्या या टीकेला आता संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.