Sangli-Satara MLC: सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यात खरी लढाई भाजपचे धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उद्योजक अभयसिंह जगताप (Abhaysinh Jagtap) यांच्यामध्ये होत आहे. या दोन्ही जिल्ह्यात महायुतीची ताकद पाहाता भाजपचा उमेदवार सहज निवडून येऊ शकते. परंतु दोन्ही जिल्ह्यातील राजकारण एेवढे सोपे नाही. त्यात विधानपरिषद निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण असते. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य सांभाळावे लागते. एेनवेळी अर्थकारणातून गेम होऊ शकतो. महायुतीकडे संख्याबळ असले तरी सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या वादातून राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य नाराज आहे. त्यामुळे आपला उमेदवार डेंजर झोनमध्ये जावू नये म्हणून भाजपचे तीन मंत्री, शिवसेना व राष्ट्रवादीचे मंत्री असे पाच मंत्री लक्ष ठेवून आहेत.
कोणाकडे किती मतदान ?
सांगली-सातारा मतदारसंघात एकूण 895 मतदार आहेत. त्यात सांगली जिल्ह्यात 423 मतदार आहेत. तर सातारा जिल्ह्यात तब्बल 472 मतदार आहेत. दोन्ही जिल्ह्याच्या तुलनेत साताऱ्याकडे तब्बल 49 मतदार अधिक आहेत. भाजपकडे 314 मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 205, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 119 मते आहेत. तर शिवसेनेकडे 111 आणि काँग्रेसकडे 73 मते आहेत. तर ठाकरे गटाकडे एक मत आहे. तसेच अपक्ष मतदार आहेत.
भाजपला झेडपीच्या वादाची मोठी भिती ?
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये मोठा ड्रामा पाहिला मिळला होता. सातारा झेडपी ताब्यात येण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीने डाव टाकला होता. दोघांना भाजपला दूर ठेवायचे होते. परंतु मंत्री जयकुमार गोरे यांनीही राष्ट्रवादीचे काही सदस्य फोडले. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष झाला. या निवडणुकीत थेट पोलिस बळाचा वापर केल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता. पोलिसांबरोबरच्या झटपटीत शंभूराज देसाई हे जखमी झाले होते. या घटनेनंतर मंत्री मकरंद पाटील हे नाराज होते. ती नाराजी विधानपरिषद निवडणुकीत दिसली. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या उमेदवारी अर्ज भरायला मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे गैरहजर होते. तर शिवसेनेकडून अपक्ष म्हणून तानाजी पाटील हे रिंगणात उतरले होते. परंतु शेवटी देसाई, मकरंद पाटील हे महायुतीच्या उमेदवारासाठी मैदानात उतरले. अपक्ष तानाजी पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. शंभूराज देसाई यांनी युती धर्म पाळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु झेडपीचा वाद शिवसेना-राष्ट्रवादी सदस्य विसरले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत वेगळ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. तर महाविकास आघाडीचा उमेदवार हा आर्थिकदृष्ट्या तगडा आहे. त्यामुळे या मतदारसंघात अनपेक्षित निकालही लागू शकते, असे स्थानिक पत्रकारांचे मत आहे.
भाजपच्या विजयाचे गणित राष्ट्रवादी, शिवसेनेवर अवलंबून
भाजप उमेदवाराला विजयी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची मदत लागणार आहे. परंतु महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सदस्य विरोधात गेली तर मात्र भाजपचा उमेदवार डेंजर झोनमध्ये जावू शकतो. कारण दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे सदस्य एकत्र आल्यास 500 मते होऊ शकतात. त्यात अपक्ष मते मिळू शकतात. परंतु राज्यातील राजकारण पाहाता असे समीकरण अस्तित्वात येऊ शकत नाहीत. तर दुसरीकडे दगाफटका होऊ नये म्हणून सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील असे पाच मंत्र्यांनी फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत येथे काही राजकीय चमत्कार होतोय का हे मतमोजणीच्या दिवशीच समोर येईल एेवढे मात्र नक्की.
