Sanjay Raut criticizes Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात राऊत यांनी पवारांच्या विरोधी पक्षनेते म्हणून क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा एकदा अजित पवारांची खोडी काढली आहे. पाकिस्तानी गुप्तचर महिलेला लष्करी गुपिते पुरविण्याच्या कथित आरोपावरून चर्चा सुरू आहे. याबाबत विरोधी पक्षाकडून डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कुरुलकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधावरून टीका केली आहे. या अनुषंगाने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार बोलत नसल्याचा मुद्दा राऊत यांनी उपस्थित केला आहे.
सामना अग्रलेखात म्हटले आहे की, डॉ. कुरुलकर हे शेख, हुसेन, इब्राहिम असते तर थेट दाऊदशी संबंध जोडून विरोधी पक्षालाच जाब विचारणारे आंदोलन सुरू झाले असते, पण डॉ. कुरुलकरांच्या बाबतीत भाजप व संघ ‘मौना ‘त गेले. यालाच ढोंग म्हणतात! नवाब मलिक यांनी एक जमिनीचा तुकडा विकत घेतला. इकडे भाजपच्या देशभक्तांनी देश विकला! फरक कळतोय का? निदान महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यांनी तरी यावर प्रश्न विचारायला हवेत!
गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका सुरू आहे. प्रामुख्याने अजित पवार यांना टार्गेट ते करतात. राऊत यांनी रोखठोक सदरामध्ये ‘लोकशाहीची धूळधाण, फोडाफोडीचा सिझन-2’ असा लेख लिहिला होता. त्यात अजित पवार यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या कथित बंडाबाबत जोरदार चर्चा आणि बातम्या माध्यमांमध्ये सुरू झाल्या. त्यांच्याच पक्षाविषयी बोलावं. आमच्या पक्षाचं वकीलपत्र कुणी घेऊ नये, असा सज्जड दम अजित पवारांनी भरला. त्यांनतर ते जागेवर आले.
अजित पवार गोड माणूस आहे असे सांगितले. मात्र त्यानंतरही अजित पवार भाजपच्या वाटेवर आहेत. पवार नवीन नेतृत्व घडविण्यात अपयशी असल्याचा आरोप अग्रलेखातून केला. यावरून छगन भुजबळ यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? त्यांना असे वाटते का की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. आघाडीमध्ये मनभेद निर्माण व्हावेत, असा सवाल त्यांनी केला.
स्वतः शरद पवार यांनी आपण सामनाच्या अग्रलेखाला किंमत देत नाही असे सांगून राऊत यांना टोला लगावला होता. मात्र तरीही राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांची खोडी काढली आहे.