लोकशाही संपवून राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा प्रयत्न , 850 खासदारांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

एक देश, एक निवडणूक, मतदारसंघ पुनर्रचना, केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केले.

Untitled Design 32

Untitled Design 32

Sanjay Raut launches a scathing attack on the BJP : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप करत, 850 खासदार करून संविधानात बदल करत देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी एक देश, एक निवडणूक, मतदारसंघ पुनर्रचना, केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केले. राऊत म्हणाले की, एक देश, एक निवडणूक या प्रस्तावासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली असली तरी त्या समितीत भाजपचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे इतर पक्षांनी विरोधाची भूमिका घेतली तरी भाजप आपला अजेंडा बहुमताच्या जोरावर पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यांच्या मते, भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एक देश, एक निवडणूक ही संकल्पना व्यवहार्य नाही. प्रत्येक राज्याचे प्रश्न, परिस्थिती, सामाजिक रचना आणि प्राधान्यक्रम वेगळे आहेत. मात्र भाजपला एक देश, एक निवडणूकपेक्षा एक पक्ष, एक निवडणूक यामध्ये अधिक रस असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत यांनी पुढे दावा केला की, महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणले जात असून त्यामागे लोकसभेतील खासदारांची संख्या 850 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे.

खासदारांची संख्या वाढवल्यानंतर संविधानात बदल करून देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू करण्याचा भाजपचा डाव आहे. त्यानंतर लोकशाहीची विद्यमान संसदीय व्यवस्था संपवून राष्ट्राध्यक्षाला अमर्यादित अधिकार देण्याची योजना आहे. अशा व्यवस्थेत राष्ट्राध्यक्ष आपल्या इच्छेनुसार मंत्रिमंडळ नेमू शकतो. निवडून आलेल्या प्रतिनिधींमधूनच मंत्री असावेत, अशी सक्ती राहत नाही, असा आरोप त्यांनी केला. भाजपची वाटचाल याच दिशेने सुरू आहे. आधी मतदारसंघ पुनर्रचना मंजूर करून घ्यायची, त्यानंतर संविधानात बदल करून देशातील लोकशाही व्यवस्था बदलायची आणि राष्ट्राध्यक्षपदी नरेंद्र मोदी यांना बसवायचे, असा त्यांचा प्रयत्न आहे.

राष्ट्रवादी मनसे अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात…,पक्षांंतराच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी

त्यामुळे एक देश, एक निवडणूक हा केवळ वरवरचा मुद्दा असून त्यामागे वेगळाच राजकीय हेतू आहे, असे देखील राऊत म्हणाले. भारतीय संविधानाने देशाला दिलेली संसदीय लोकशाही कुणालाही मोडता येणार नाही, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान निर्मात्यांनी दिलेल्या मार्गावरच देश चालला पाहिजे. संविधानानुसारच संसद, लोकशाही आणि निवडणुका सुरू राहतील, ही आमची ठाम भूमिका आहे. केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलावरही राऊत यांनी भाष्य केले.

20 तारखेला संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी मंत्रिमंडळात बदल होण्याच्या चर्चा आहेत. अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री किंवा संरक्षणमंत्र्यांमध्ये बदल होऊ शकतात, अशा बातम्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांनाही केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा आहे, असे ते म्हणाले. फडणवीस यांना शुभेच्छा देताना राऊत म्हणाले, जर 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानपदासाठी संधी मिळाली, तर महाराष्ट्रासाठी ती आनंदाची बाब असेल. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कारण 2029 नंतर भाजपची सत्ता राहणार नाही, असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे जे काही राजकीय निर्णय घ्यायचे असतील ते त्यांनी त्याआधीच घ्यावेत. याच पत्रकार परिषदेत राऊत यांनी आणखी एक मोठा दावा करत, एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत, असेही स्पष्टपणे सांगितले.

Exit mobile version