Sanjay Raut On Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. दौऱ्यादरम्यान ते प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा दौरा हा राज्यातील राजकारणासाठी देखील महत्वाचा आहे.
त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावर राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, ‘प्रभू श्रीराम हे सत्याचं प्रतिक होते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात केलाली पापं जाऊन रामाच्या चरणी धुवायची असतील तर त्यांनी जाव पण केलेली पापं धुवायला गेलेल्यांना प्रभू श्रीरामांचे आशिर्वाद मिळत नाही. अशी टीका यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर संजय राऊत यांनी केली आहे.
त्याचबरोबर पुढे राऊत असं देखाल म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवला आहे. जे लोक आता अयोध्येत जात आहेत. त्यांनाही मार्ग आम्हीच दाखवला आहे. त्यामुळे शिंदेंनी देखील अयोध्यात जावं आणि सत्याचा बोध घेऊन यावं. तर गिरीश महाजन यांना इतक्यावर्षी जावसं वाटलं नसेल आता जावसं वाटलं असेल. असं देखील यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.
आमदार- खासदारासह मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्यावर
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते देखील तयारीला लागले आहे. शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते आज ट्रेनने अयोध्येच्या दिशेला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे या शिवसैनिकांसाठी सरकारकडून ठाणे आणि नाशिक येथून सुटणाऱ्या दोन विशेष ट्रेनची सुविधा करण्यात आलेली. हे कार्यकर्ते आज अयोध्येला पोहोचणार आहेत.