शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख सोनेरी टोळी असा केला आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर काय चालले याचा शोध पत्रकारांनी घ्यावा, असे ते म्हणाले. तसचे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पहिल्या दहामध्ये नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते पहिल्या पाचमध्ये होते, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ( Ekanath Shinde ) निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राची प्रगती आणि विकास काही लोकांना पहावत नव्हता म्हणून उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. त्यांनी दिल्लीच्या हस्तकाला मुख्यमंत्री म्हणून बसवले आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पहिल्या दहामध्ये नाही, याची मिंधे गटाला लाज वाटली पाहिजे, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानींवर उत्तर द्यायला पाहिजे होते. त्यांनी उत्तर दिले नाही, हा पलायनवाद आहे, पळपुटेपणा आहे, असे म्हणत त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला. मोदीेंवर हक्कभंग यायला पाहिजे होता. त्यांनी राहुल गांधींच्या आरोपांवर एकही उत्तर दिले नाही. हा लोकसभा नियमांचा भंग आहे, असे म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली आहे. तसेच येणाऱ्या काळातील मुंबई महापालिका, ठाणे महापालिका या निवडणूका शिवसेनाच जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राऊत यांनी बोलताना इलेक्शन कमिशन व सर्वोच्च न्यायालयावर देखील भाष्य केले. ज्याप्रकारची वक्तव्य देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि मिंधे गटाचे लोक करत आहेत. यावरुन त्यांनी निवडणुक आयोग आणि सर्वोच न्यायलयाला विकत घेतले आहे का असा प्रश्न उपस्थित होतो, असे राऊत म्हणाले.