Sanjay Shirsat : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रात जावं राज्यात एकनाथ शिंदे आहेत असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ते भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले होते. काल दिवसभरात त्यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत सारवासारव केली. शिरसाट म्हणाले, मी काल देवेंद्रजींबाबत त्यांनी केंद्रात जावं असं वक्तव्य केलं. ते अनेकांनी उलटं घेतलं. आम्ही जो उठाव केला त्यात फडणवीसांचीही भूमिका होती. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांची बढती व्हावी या अनुषंगाने मी बोललो होतो, असे शिरसाट म्हणाले.
युवकांच्या प्रश्नांसाठी रोहित पवार मैदानात, पुणे ते नागपूर काढणार युवा संघर्ष यात्रा
ते पुढे म्हणाले, आागामी 2024 मधील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढल्या जातील असे फडणवीस यांनीच जाहीर केलं होतं. त्यामुळे विरोधक आता काहीही बोलले, त्यांनी याचं भांडवल केलं तरी मला काही फरक पडत नाही. मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय वरिष्ठ घेतील. याआधी मी नगरसेवक होतो नंतर आमदार झालो आता मंत्रिपदाचे डोहाळे लागले. मी देवेंद्रजींबद्दल बोललो त्यांना केंद्रात मोठं पद मिळावं या हेतून बोललो होतो. परंतु, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. आता येथून पुढे मी काही न बोललेलंच बरं असेही शिरसाट म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी पुढील पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री राहावे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जावे, असे वक्तव्य आमदार शिरसाट यांनी केले होते. त्यांनी ज्या पद्धतीने हे वक्तव्य केले त्यावरून वाद होणार याचा अंदाज होताच. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच त्यांचे वक्तव्य आल्याने शिंदे गटाची अस्वस्थता वाढली होती. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनीही शिरसाट यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे चोवीस तासातच शिरसाट यांनी या वक्तव्यावर माघार घेत आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्ट करत सारवासारव केली.
निवडणुकांपूर्वी सीमावाद PM मोदींच्या रडारवर; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला PMO चे पत्र