Sanjay Shirsat on Operation Tiger: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलेल्या विधानानंतर आता मंत्री संजय शिरसाट यांनीही याबाबत मोठा दावा केला आहे. ‘ऑपरेशन टायगर होणार हे निश्चित आहे. मात्र, ते नेमके कधी होईल, हे सांगता येणार नाही,’ असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. अनेक नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेतील इतर नेत्यांच्या संपर्कात असून, पक्षप्रवेशासाठी इच्छुक असल्याचा दावाही त्यांनी केला.
कॉक्रोच जनता पार्टीला साथ देणारे सोनम वांगचुक प्रशासनाच्या कचाट्यात; आता थेट 60 दिवस नजरकैद
शिरसाट म्हणाले की, अनेक जण एकनाथ शिंदे आणि आमच्यासारख्या नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छाही व्यक्त करत आहेत. त्यामुळे उदय सामंत यांच्या विधानामागेही हेच कारण आहे. मात्र, कोणाला पक्षात घ्यायचे, याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील. ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात.
संजय राऊत यांच्या धमकीचे सरकारने गांभीर्याने घेतले
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही शिरसाट यांनी निशाणा साधला. संजय राऊत नेहमीप्रमाणे वक्तव्य करत असतात. आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक पक्ष सोडून गेले, तेव्हा ते माकड नव्हते का? असा सवाल त्यांनी केला. पक्षाचे वाटोळे होत असतानाही राऊत यांचा अहंकार कमी झालेला नाही. मात्र, त्यांना कार्यकर्ते वैतागले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
तसेच, संजय राऊत यांनी दिलेल्या धमकीचे सरकारने गांभीर्याने घेतले असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. झाडे तोडण्यात सरकारला कोणताही रस नाही. मात्र, विकास प्रकल्प रखडू नये, अशी सरकारची भूमिका आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
राम मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांवर मकोका लावा
छत्रपती संभाजीनगरमधील राम मंदिराच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावरही संजय शिरसाट यांनी भूमिका मांडली. राम मंदिर किंवा अन्य मंदिरांच्या जागा विकल्या जात असतील, तर काहींना लवकर करोडपती व्हायचे असावे, असा टोला त्यांनी लगावला. भूमाफिया कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोठी स्वप्नं, प्रेम आणि अनपेक्षित वळणं, हिंदी Zee 5 कडून ‘तीन तिगाडा’चा ट्रेलर प्रदर्शित
मंदिरांच्या जागा बळकावून त्यांची विक्री करणे हा गंभीर प्रकार आहे. शहरात अनेक ठिकाणी लेआउट टाकून नागरिकांकडून पैसे घेण्यात आले होते. अशा लेआउटवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. मात्र, अतिक्रमण हटवण्यात आले असले तरी संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. भूमाफियांना कोणत्याही पक्षाचा पाठिंबा असला तरी पोलिसांनी आणि महानगरपालिकेने त्यांच्यावर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अजितदादांची उंची पुतळे आणि रस्त्यांवरून मोजता येणार नाही
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना शिरसाट यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. अजित पवार यांचे नेतृत्व केवळ रिंग रोड आणि पुतळ्यांपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी महाराष्ट्रात कणखर नेतृत्व निर्माण केले होते. त्यांच्या आवाजातील आणि बोलण्यातील दम संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असे ते म्हणाले. अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने स्मारके किंवा रस्ते उभारले तरी ते कमीच आहे. मात्र, अजितदादांची उंची पुतळे आणि रस्त्यांवरून मोजली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विमानसेवा वाढवा, मराठवाड्यावर अन्याय करू नका!
छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील मर्यादित विमानसेवेबाबतही संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि उद्योजकांनी केंद्र सरकारकडे अनेकदा विमानसेवा वाढवण्याची मागणी केली आहे. मात्र, रूट मिळत नाही किंवा प्रवासी मिळत नाहीत, असा चुकीचा गैरसमज पसरवला जात आहे, असे ते म्हणाले.
नाव, फोटो अन् शैलीवर चाकणकरांचा कॉपीराइटचा दावा; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ला कोर्टात अडकणार?
छत्रपती संभाजीनगरसारख्या मोठ्या विमानतळावरून मोजकीच विमाने ये-जा करतात, ही चिंतेची बाब आहे. शहरातील उद्योगांचा विस्तार होत असताना विमानसेवेचे जाळेही वाढले पाहिजे. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातील लोकांनाही या शहराशी जोडण्यासाठी विमानसेवा वाढवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि मराठवाड्यावर अन्याय करू नये, अशी मागणी शिरसाट यांनी केली.
