Sanjay Shirsat on Devendra Fadnavis and Thackeray Brothers: ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या व्यंगचित्र संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन्ही बंधू उपस्थित होते. विशेष म्हणजे, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतही सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ठाकरे बंधू आणि फडणवीस एकत्र आल्याने नवी समीकरणं नाहीत!
ठाकरे बंधू आणि देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात आले म्हणून राज्यात नवी राजकीय समीकरणं तयार होतील, असा अर्थ काढणं चुकीचं आहे. राजकारणात नेते एकमेकांना भेटत असतात. यामध्ये काही वेगळं नाही. राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात काय चर्चा झाली आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2019 नंतर राज्यात जे काही घडलं, त्यातूनच आम्ही उठाव केला. तो उठाव केला नसता, तर भाजप सत्तेत आली नसती, असं संजय शिरसाट म्हणाले.
तीन महिन्यांत राज्यात मोठ्या घडामोडी होणार?
दरम्यान, भाजप नेते नवनाथ बन यांनी टीका करताना आपली पातळी सांभाळावी, असा इशाराही शिरसाट यांनी दिला. अन्यथा त्यांच्या वक्तव्यांना देवेंद्र फडणवीस यांची मान्यता आहे का, असा सवाल आम्हालाही उपस्थित करता येईल, असं ते म्हणाले. पुढील तीन महिन्यांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील, असं सूचक विधानही त्यांनी केलं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी बरीच चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिंदे हे सर्वसामान्य माणूस आहेत, असंही ते म्हणाले.
पूर्णेकर हत्या प्रकरणावरून शिंदेंना टार्गेट केलं जातंय!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात एकनाथ शिंदे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी केला. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतात, त्यामुळे त्यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अशा प्रयत्नांना यश येणार नाही, असं ते म्हणाले. शिवाय भाजप आणि शिंदेसेनेत कोणतीही धुसफूस नसून आमच्यात सगळं काही आलबेल आहे, असा दावाही शिरसाट यांनी केला.
