Satara Bank Election Result : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला. उत्सुकता असलेल्या फलटण सोसायटी मतदासंघ विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरांनी राखलाय. फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे थोरले बंधू व फलटणचे नगराध्यक्ष समेशरसिंह निंबाळकरांना पराभव झाला. त्यांच्याविरोधात विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे निंबाळकरांचे आव्हान होते. विधानसभा, नगरपालिकेतीही पराभावाचा हिशोब एकप्रकारे रामराजे निंबाळकरांनी चुकता केलाय.
फलटणध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे नेते व माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आहे. प्रत्येक निवडणुकीत संघर्ष उफाळून येतो. मागील माढा लोकसभा मतदारसंघात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा पराभव झाला होता. रामराजे नाईक निंबाळकरांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धक्का देत महायुतीचा उमेदवार निवडून आला. फलटणध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये लढत झाली होती. रणजितसिंह निंबाळकरांचे समर्थक भाजपचे सचिन पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तर रामराजे निंबाळकर यांचे समर्थक दीपक चव्हाण हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून रिंगणात होते. राखीव झालेल्या फलटण मतदारसंघात रामराजे निंबाळकरानंतर दीपक चव्हाण हे तीन टर्म आमदार झाले. रामराजे निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होते. त्यामुळे ते निवडणुकीत सक्रीय नव्हते. परंतु छुपा पाठिंबा दिपक चव्हाणांना होता. तर त्यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी संजीवराजे निंबाळकर दीपक चव्हाणांसाठी प्रचार करत होते. परंतु रणजितसिंह निंबाळकरांच्या ताकदीमुळे सचिन पाटील विजयी झाले. एका अर्थाने रामराजे निंबाळकरांचा मतदारसंघ रणजितसिंह निंबाळकरांनी हिसकावून घेऊन लोकसभेचा वचपा काढला होता.
फलटण नगरपालिकाही हिसकावून घेतली
त्यानंतर फलटण नगरपालिकाही रामराजे निंबाळकरांच्या ताब्यातून गेली. फलटण नगरपालिकेसाठी रामराजे निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकरांमध्ये मोठी राजकीय संघर्ष झाला. रामराजे निंबाळकरांचा मुलगा अनिकेतराजे निंबाळकर हे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले होते. तर त्यांच्यासमोर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे थोरले बंधू समशेरसिंह निंबाळकर मैदानात उतरले होते. परंतु अनिकेतराजे निंबाळकरांचा तब्बल 600 मतांनी पराभव झाला. रामराजेंच्या हातातून नगरपालिकाही गेली. त्याचा मोठा धक्का रामराजे निंबाळकरांना बसला होता.
सहकारावर मात्र रामराजेंचा दबदबा
दोन निवडणुकीनंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये निंबाळकर घराण्यामध्ये जोरदार लढत झाली. त्यात ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे निंबाळकरांनी बाजी मारली. त्यांना 71 मते मिळाले. ते पहिल्यांदाच जिल्हा बँकेचे संचालक झाले. त्यांच्या विरोधात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे थोरले बंधू आणि फलटणचे विद्यमान नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर रिंगणात होते. त्यांना 60 मते मिळाली. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत पराभवाचा बदला रामराजे निंबाळकरांनी जिल्हा बँकेत घेतला. पण माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे बँका व नागरी पतसंस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले होते. मात्र, त्यांच्या बंधूंचा मात्र पराभव झाला आहे. त्यातून सहकारात आपल्याचा दबदबा असल्याचे रामराजे निंबाळकरांनी दाखवून दिलंय.
