Satara District Bank Election 2026 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank Election 2026) निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्वीस्ट आला. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) , सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) आणि राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्यासह अनेक विद्यमान संचालकांनी निवडणुकीतून माघार घेतलीय. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) निकषांमुळे सलग दहा वर्षांहून अधिक काळ संचालक राहिलेल्या काही नेत्यांच्या पात्रतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे निवडणुकीच्या समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तब्बल नऊ जागा बिनविरोध झाल्यात. पाटण, माण आणि फलटणमधील लढतींकडे आता लक्ष लागले आहे.
पाटण, माण आणि फलटणमध्ये प्रतिष्ठेच्या लढती
नऊ जागा बिनविरोध झाल्या असल्या, तरी उर्वरित मतदारसंघांतील लढतींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः पाटण, माण आणि फलटण येथील लढती प्रतिष्ठेच्या मानल्या जातायत.
पाटणमध्ये देसाई विरुद्ध पाटणकर
पाटण सोसायटी मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाई (शिवसेना) आणि सत्यजितसिंह पाटणकर (भाजप) यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल.
माणमध्ये गोरे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष
माण मतदारसंघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (भाजप), त्यांचे बंधू शेखर गोरे (शिवसेना) आणि मनोज पोळ (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष) यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. या लढतीत मतांची विभागणी कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
फलटणमध्ये संजीवराजे विरुद्ध समशेरसिंह
फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर यांच्यात थेट सामना होणार आहे.
काय राव, जरांगेंनी काय माल पटवलाय, माझ्याकडेही एक क्लिप आहे, अजय बारस्करांचा जरांगेंवर पलटवार
आरबीआयच्या निकषांमुळे दिग्गजांची माघार
सलग दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालकपदावर राहिलेल्या नेत्यांना RBI च्या निकषांमुळे अपात्रतेची टांगली तलवार आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्यासह अनेक विद्यमान संचालकांनी निवडणुकीतून माघार घेतली. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. तर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली आहे.
उच्च न्यायालयात एकनाथ घोगरेंची याचिका फेटाळली; सुजय विखेंचा जिल्हा बँकेतील मार्ग मोकळा!
उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंच्या जागी समर्थकांना संधी
दिग्गज नेत्यांच्या माघारीमुळे त्यांच्या समर्थकांसाठी बँकेच्या संचालकपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा तालुका सोसायटी मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माघारीनंतर जितेंद्र सावंत यांची बिनविरोध निवड झाली. वाई तालुका सोसायटी मतदारसंघातून नितीन पाटील यांच्या माघारीनंतर सत्यजित वीर यांची बिनविरोध निवड झाली.
माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर बिनविरोध
गृहनिर्माण व पाणीपुरवठा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांचे समर्थक काका धुमाळ यांना संधी मिळाली आहे. खरेदी-विक्री मतदारसंघातून मंत्री मकरंद पाटील बिनविरोध निवडून आले. बँका व नागरी पतसंस्था मतदारसंघातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, तर कृषी प्रक्रिया मतदारसंघातून आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पहिल्यांदाच बिनविरोध संचालकपद मिळवले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांना आव्हान दिले होते. उमेदवार दिला जाईल, परंतु रामराजे निंबाळकरांनी उमेदवार दिलेला नाही.
कराडमधील राजकीय समीकरणे बदलली
कराड सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीतही मोठा बदल झाला आहे. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माघार घेतल्याने या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मागील निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी डॉ. अतुल भोसले यांच्याशी हातमिळवणी करून ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा पराभव केला होता. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राजकीय रणनीतीमुळे बाळासाहेब पाटील यांना माघार घ्यावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
