Download App

Nana Patole News : तांबेंच्या बंडखोरीला नाना पटोलेच जबाबदार, देशमुखांचा थेट लेटर बॉम्ब

  • Written By: Last Updated:

मुंबईः सत्यजित तांबेंच्या (satyjeet tambe) बंडखोरीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh)यांनी तांबेंच्या बंडखोरीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांना बदलावे, असे पत्रच देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिले आहे. पटोले यांच्यावर काही आरोप देशमुख यांनी केले आहेत.

कॉंग्रेस पक्ष इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा मागे पडला आहे. आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करतांना दिसत नाही, ही वस्तूस्थिती आहे. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉग्रेसची दाणादाण उडत असल्याचे देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची वाताहत सुरू झाली असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये विधानपरिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून काँग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या, अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळे यांचा जबरदस्त विजय झाला.

ठोस रणनीती प्रदेशाध्यक्षांना कितपत जमेल, ही शंका आहे.महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष आजच्या घडीला सक्षम नेतृत्व नसणारा पक्ष म्हणून दिसत आहे. विविध निवडणुकींमध्ये सतत होणारे पराभव असण्याचे कारण म्हणजे पक्षाची असलेली दयनीय अवस्था आहे. या पक्षात नेते उरले आहेत. परंतु कार्यकर्ते नाहीत. राज्यात या पक्षाचा चेहरा गेल्या अनेक वर्षापासून बदलला नाही. गेली अनेक वर्षे त्याच त्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. तळागाळातील कार्यकर्ते यामुळेच पुढे जाऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नवे चेहरे क्वचितच दिसत आहेत. परिणामी राजकीय करिअरसाठी काँग्रेस विचारसरणीचे लोकं इतर पक्षांमध्ये जात आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस असे अनेक पक्ष राज्यात प्रभावशाली होत आहेत.

त्यामुळे महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिति सुधारण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तत्काल बदलण्याची नितांत गरज आहे. प्रदेशाध्यक्ष असा असावा, जो महाराष्ट्राच्या गावा-गावांत फिरून जनतेचे प्रश्न उचलून त्यांस वाचा फोडेल आणि कॉंग्रेसची स्थिति मजबूत करेल. कॉंग्रेसच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या पत्राची गंभीर दखल घ्यावी, असे पत्रात म्हटले आहे. डॉ. आशिष देशमुख नागपूरमधील माजी आमदार आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य आहेत.

Tags

follow us