अकोले : अमित भांगरे (Amit Bhangare) या तरुणाच्या पाठीशी शक्ती उभी करा. तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्रातले राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या तिसऱ्या उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे अशी लढत होताना दिसणार आहे. दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या 61 व्या जयंतीनिमित्त शरद पवार हे अकोले येथे आले होते. यावेळी जाहीर सभेत पवार बोलत होते. (Sharad Pawar announced the candidature of Amit Bhangre from Akole constituency)
राष्ट्रवादी मधील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी नगर जिल्ह्यावर आपले केंद्र लक्षित केले आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी नगर जिल्ह्याचा दौरा केला होता. यात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मतदारसंघांचा आढावा घेतला. आता शरद पवार यांनीही नगरवर लक्ष केंद्रीत केले आहे. यातच आज अकोले येथे रॅली आणि जाहीर सभा घेत शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमित भांगरे यांना पाठबळ दिले आहे.
एकनाथ शिंदेंनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन… 110 जागांवर सुरु केली विधानसभेची तयारी
शरद पवार हे मागील काही दिवसांपासून साथ सोडलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व शोधत आहेत. यासाठी ते यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार, भाजपचे माजी आमदार, भाजपमध्ये डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करत आहेत. शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचे धोरण आखले आहे. याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये बी. एस. पाटील, शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, भंडारा-गोंदियाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांना पुन्हा पक्षात आणले आहे. प्रशांत यादव यांच्यारुपाने आमदार शेखर निकम यांनाही पर्याय शोधला. सुधाकर भालेराव यांना पक्षात घेऊन मंत्री संजय बनसोड यांना आव्हान देण्यासाठी तयारी केली आहे.
जरांगेंकडून महादेव जाणकरांचा उल्लेख मात्र पुन्हा भुजबळांना टोला, म्हणाले, आमचा विरोधक …
अशात आता किरण लहामटे यांच्याविरोधात दुसऱ्या फळीतील अमित भांगरे यांना ताकद दिली आहे. अमित भांगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अशोक भांगरे यांचे पुत्र आहेत. अमित यांच्या आई, सुनिता भांगरे या जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत. स्वतः अमित आता अहमदनगर जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आहेत. भाजपचे नेते वैभव पिचड, मधुकर पिचड यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. गतवेळी पिचडांनी साथ सोडल्यानंतर अशोक भांगरे हे विधानसभेसाठी इच्छुक होते. पण किरण लहामटे यांना संधी देण्यात आली. यानंतरही नाराज न होता अशोक भांगरे यांनी शरद पवार यांचा शब्द प्रमाण मानून किरण लहामटे यांच्या विजयासाठी कष्ट घेतले. लहामटे इथून 58 हजार मतांनी आमदार झाले. आता पवार यांनी अशोक भांगरे यांचे चिरंजीव अमित भांगरे यांच्यामागे ताकद उभी केली आहे.
दरम्यान, या मतदारसंघातील भाजपमध्ये असणारे पिचड पिता-पुत्र काय करणार हा प्रश्न सध्या कळीचा ठरत आहे.गेली अनेक वर्ष शरद पवार यांच्यासोबत असलेले मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यांच्याविरोधात लहामटे यांना संधी दिली आणि आमदारही बनवले. मात्र राष्ट्रवादीमधील फुटीनंतर लहामटे अजित पवार गटाकडून विधानसभेच्या तयारीत आहेत. ज्यांचा आमदार त्यांची जागा असा फॉर्म्युला असल्याने ही जागा त्यांनाच सुटेल हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भाजपात असलेले पिचड पिता-पुत्र यांची भूमिका काय असणार हे मात्र अद्याप गुलदस्तातच आहे