बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळण औरंगपूर ग्रामपंचायत निवडणुकीत, अवघ्या 21 वर्षाची तरुणी सरपंच पदी विराजमान झालीय. भारती मिसाळ असं या तरुणीचे नाव असून बारामतीत कृषी पदवीचं ती शिक्षण घेत आहे. 684 मताधिक्यानं ती निवडून आली असून आज गावात तिची मिरवणूक काढून गावच्या लेकीचं कौतुक करण्यात आले.
यंदा झालेली ग्रामपंचायत निवडणुक नेत्यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. यात प्रस्थापितांना मतदारांनी बाजूला सारत नव्या तरुण उमेदवाराला संधी दिल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. आपल्या गावाचं नाव राज्य पातळीवर निघावं हा ध्यास घेत भारतीने राजकारणात पाऊल टाकले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चर्चेतील ग्रामपंचायत निवडणुकांपैकी ही देखील एक ग्रामपंचायत चर्चेची ठरली आहे.
दुसरीकडे बीड जिल्ह्यातील काका पुतण्याच्या लढतीत पुन्हा पुतण्यानं बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवार नवगण राजूरी गावाच्या ग्रामंचायत निवडणुकीसाठी आमनेसामने उभे होते. या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता येण्यासाठी दोन्ही गटाकडून ताकत लावली होती, मात्र नवगण राजुरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच गटाला झुकतं माप दिलं.
ग्रामपंचायत निवडणूक निकालात आज संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविलाय. जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी अधिराज्य असलेल्या दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांची राजकीय कारकिर्द देखील नवगण राजुरीच्या (ता. बीड) सरपंच म्हणूनच सुरु झाली. दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांचे बीड तालुक्यातील नवगण राजुरी हे बाजारपेठेचे व जिल्हा परिषद सर्कलचे गाव आहे. त्यामुळे या गावाला तगडं राजकीय महत्व आहे.
दिवंगत केशरबाई क्षीरसागर देखील येथील सरपंच राहिल्या आहेत. त्यांच्यानंतर ग्रामपंचायतीची सत्ता कायम त्यांचं चिरंजीव रवींद्र क्षीरसागर यांच्या अधिपत्याखाली राहिली. त्यांच्यासह खुद्द त्यांच्या दिवंगत पत्नी व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई क्षीरसागर यांनी देखील येथील सरपंचपद सांभाळलं.