Download App

शिंदे गटातील आघाडीचे मंत्री पण, निष्ठा अजून ठाकरे गटाशीच?

प्रशांत गोडसे
मुंबई, प्रतिनिधी


Shambhuraj Desai :
राज्यातील सत्ताधारी शिवसेना-शिंदे गटाचे आघाडीचे शिलेदार, महायुती समन्वय समितीचे सदस्य तसेच पर्यटन मंत्री असलेले शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. मात्र, त्यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांच्या नावाच्या वेबसाईटवर आजही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असल्याचं दिसून येत आहे. या फोटोंमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महायुती सरकार स्थापन
शिंदे गटात सामील झाल्यानंतर तीन वर्षे उलटून गेली असतानाही देसाई यांच्या फेसबुकवर प्रोफाइलमधील डिटेलमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाने वेबसाईट लिंक संकेत स्थळाची इंनबील्ड करण्यात आले.
https://www.shambhurajdesai.com

शंभूराज देसाईंच्या वेबसाईटवर मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा एकही फोटो नाही. उलट हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. हे अनेकांसाठी भुवया उंचावणारे ठरत आहे. त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे जुने फोटो अजूनही कायम आहेत, आणि त्याच फेसबुक पेजशी लिंक असलेल्या वेबसाइटवरही एकनाथ शिंदे यांचा कुठेही उल्लेख नाही.

निष्ठा कोठे?
शंभूराज देसाई यांच्यावर शिंदे गटाच्या भूमिकेचे सार्वजनिक प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी असूनही, त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत ठाकरे कुटुंबाचे अस्तित्व कायम असणे, हे अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. विशेष म्हणजे देसाई हे अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दांत टीका करताना दिसतात. मात्र, त्याचवेळी त्यांच्या नावाच्या वेबसाईटवर आजही उद्धव ठाकरेंचा सन्मान कायम असल्याचे चित्र आहे.

फडणवीस आहेत, पण शिंदे नाहीत!
देसाई यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही दिसतो. मात्र, ज्या पक्षाचे ते आज आमदार आहेत, त्या शिंदे यांच्या फोटोला तिथे स्थान नसणे हे राजकीयदृष्ट्या सूचक मानले जात आहे.

सामाजिक संकेतस्थळांकडे दुर्लक्ष की जान बूजकर?
राजकीय विश्लेषकांच्या मते, देसाई यांच्या फेसबुकवरील वेबसाईटवरील हे दृश्य दोन शक्यतांकडे बोट दाखवतं आहे. एक म्हणजे ही पूर्णपणे दुर्लक्षाची बाब असू शकते. दुसरी, अधिक चर्चात्मक बाब म्हणजे, ही निष्ठेची अनभिज्ञ कबुली असू शकते!

शिवसेना शिंदे गटात नाराजीचे संकेत?
या प्रकरणामुळे शिंदे गटात अंतर्गत नाराजीची शक्यता व्यक्त केली जात असून, देसाई हे पक्षात असूनही सामाजिक माध्यमांतून वेगळाच संदेश देत आहेत का? यावर चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, एकूणच, शंभूराज देसाई सोशल मीडियावर तरी अजून ठाकरे गटातच आहेत का? हा सवाल राजकीय वर्तुळात गाजू लागला आहे. यावर देसाई काय स्पष्टीकरण देतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

follow us