Shambhuraj Desai On Rohit Pawar : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यामध्ये चांगलेच वातावरण तापलेले आहे. आता भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर तोडंसुख घेण्यात येत आहे. याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी कानाला इजा झाली नसून मनाला झाली होती, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. त्यावर आता शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्याशी लेट्सअप मराठीने संवाद साधला आहे.
देसाई म्हणाले की, रोहित पवार हे विधानसेभेतील पहिल्या टर्मचे आमदार आहेत. जे सकाळी संजय राऊत बोलले त्यांचे रिपीटेशन रोहित पवारांनी केले. रोहित पवार हे आमचे मित्र आहेत. आमदार आहेत. अजून बराच कालावधी त्यांना पूर्ण करायचा आहे. माझा मित्र म्हणून त्यांना सल्ला राहिल की राऊतांची जास्त वाक्य तुमच्या कानी पडू देऊ नका. राऊतांची संगत ज्यांना-ज्यांना लागली त्यांची काय स्थिती झाली हे सगळ्यांनी पाहिलेले आहे. तुम्ही डायग्नॉस्टिक सेंटर काढलेले नाही, असे म्हणत देसाईंनी रोहित पवारांना सुनावले. तसेच रोहित पवारांनी विनाकारण अशा गोष्टींमध्ये फार लक्ष देऊ नये, असे देखील ते म्हणाले.
‘नुसत्या नकला काढून मुख्यमंत्री होता येणार नाही’; आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं!
यावेळी त्यांनी काल छापून आलेल्या जाहिरातीवर देखील भाष्य केले आहे. ही चूक आमच्याकडून झालेली नव्हती. कालही मी बोललो. काल वर्तमानपत्रात जी जाहिरात आली होती ती आमच्या पक्षाकडून दिली गेली नव्हती. त्रयस्थ व्यक्तीने आम्हाला ज्याची माहिती नाही अशा व्यक्तीने दिली होती. आम्ही सुद्धा त्याची माहिती घेत आहोत की जाहिरात कुणी दिली.
काय म्हणाले होते रोहित पवार
इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. असो!, असे म्हणत रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.