शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली झाली. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी याची घोषणा केली पण याच पत्रकार परिषदेमध्ये वंचितची युती शिवसेनेसोबत झाली असून महाविकास आघाडीसोबत अद्याप झालेली नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
याच पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत आमचे जुने वाद आहेत, पण ते देखील आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा ठेवतो. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा वाद नक्की काय याची चर्चा नव्याने सुरु झाली. तर वाद नक्की काय आहे आणि याची सुरुवात कशी झाली, हेच आपण जाणून घेऊ.
आज वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असे आम्ही दोघे एकत्र आलो आहोत.या निमित्ताने निवडणुकांमध्ये एक बदलाचं राजकारण सुरू झालं आहे. उपेक्षितांचे,मुद्द्यांचे राजकारण पुन्हा चालू होईल अशी आम्हाला खात्री आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे.
१/४ pic.twitter.com/ovaDcmerV7
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 23, 2023
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या राजकारणाची सुरुवात ८० च्या दशकात झाली. महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा मानला जातो, त्यामुळे राजकारणात प्रवेश केल्यांनतर आपल्याला सर्व पुरोगामी नेत्यांकडून प्रतिष्ठा मिळेल, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांना होती. पण राजकारणात सक्रिय झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षित असा प्रतिसाद तत्कालीन काँग्रेस नेत्यांकडून मिळाला नाही आणि इथूनच प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या वादाची सुरवात झाली. असे मत लोकमत (Lokmat) नागपूरचे संपादक श्रीमंत माने (Shrimant Mane) असे व्यक्त करतात.
प्रकाश आंबेडकर यांनी १९८४ साली पहिली निवडणूक अकोला लोकसभा मतदारसंघातून लढवली पण त्यांना त्यात यश आलं नाही. त्यानंतरही १९८९, १९९१, १९९५ असा सलग त्यांना या मतदार संघातून पराभव स्वीकारावा लागला. पण प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून निवडून येऊ नये यासाठी शरद पवार प्रयत्नशील होते, असं काही राजकीय जाणकार सांगतात.
दरम्यानच्या काळात देशभरात जनता दलाचे सरकार आले. व्ही. पी सिंग देशाचे पंतप्रधान झाले. जनता दलाच्या मदतीने प्रकाश आंबेडकर राज्यसभेत निवडून गेले, खासदार झाले. १९९० ते १९९६ असे राज्यसभेचे सदस्य राहिले.
९० च्या सुरुवातीच्या काळात रिपब्लिकन पार्टी मध्ये फूट पडली, रामदास आठवले काँग्रेससोबत गेले. आठवलेंना काँगेसकडून मंत्री करण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस किंवा शरद पवार यांच्याकडून आपल्याला डावललं जात आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांचं झालं असं राजकीय अभ्यासक सांगतात.
१९९४ साली प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन संघाची स्थापना केली. दलितेतर ओबीसी समुदायाला जोडून प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न यशस्वी केला. ज्याची राज्यभर चर्चा झाली.
१९९८ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी दिल्लीत स्वतःची ताकद दाखवण्यासाठी राज्यात दलित ऐक्याची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि रा. सु. गवई अशा चार दलित खुल्या मतदारसंघातून लोकसभेत निवडून पाठवलं पण ही त्यांची ही एकी दीर्घकाळ टिकली नाही. शरद पवार यांनी दलित ऐक्याची घोषणा करत खासदार म्हणून निवडून आणलं पण दिर्घकालीन राजकारणासाठी प्रत्येक पक्षाला स्वतःची वोटबँक घेऊनच निर्णय घ्यावे लागतात. असं मत श्रीमंत माने व्यक्त करतात.
“शरद पवारांशी आपलं जुनं भांडण सर्वांना माहिती आहे. हे शेतातलं भांडण नाही. हे भांडण दिशेचं, नेतृत्वाचं आहे” असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा करताना केलं त्यावर लोकमतचे (Lokmat) संपादक श्रीमंत माने (Shrimant Mane) यांना आम्ही विचारलं त्यावर ते म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या राजकारणाची दिशाच वेगळी आहे.”
“ग्रामीण महाराष्ट्रात तुम्हाला जर छोट्या जातींचे संघटन उभे करायचे असेल तर तुम्हाला एक शत्रू लागतो. त्यातही मराठा समाजाशी तिथे सामाजिक संघर्ष असतोच. शरद पवार यांचे राजकारण प्रामुख्याने मराठा केंद्रीत राहिले आहे. तर प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण ओबीसी आणि छोट्या जातीच्या केंद्रित राहिले आहे. त्यामुळे एकप्रकारे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात सुप्त संघर्ष आहे असं चित्र निर्माण झाले आहे.” असं मत श्रीमंत माने व्यक्त करतात.
“२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत होती पण प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय टाळला, कदाचित त्यावेळी तो निर्णय घेतला असता तर त्यांना फायदा झाला असता” असे मत माजी आमदार जयदेव गायकवाड (Jaydev Gaikwad) व्यक्त करतात.
“प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्णय का घेतला नाही, असा प्रश्न आजही पडतो.” असं जयदेव गायकवाड (Jaydev Gaikwad) म्हणतात. ते पुढे म्हणतात की, “आज त्यांना शिवसेनेसोबत युती करावी वाटली पण तरीही त्यांनी शरद पवार यांच्याबद्दलचे हे मत टाळायला हवे होते.”