जळगाव : महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. शुभांगी पाटील यांनी आज जळगावमधील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्याचबरोबर मुक्ताईनगमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांची भेट घेतली. यावेळी नाथाभाऊंनी केलेल्या अनोख्या स्वागतानं त्यांना गहिवरून आल्याचं पाहायला मिळालं.
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत माझे बोलणे झाले. त्यांनी मला आशीर्वाद दिलाय. महाविकास आघाडीचा मला पाठिंबा आहे. त्यामुळं आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुक्ताईनगरात आले आहे.
यावेळी पाटील म्हणाल्या की, माहेरी आलेल्या मुलीला काय दिलं पाहिजे? ते त्यांनी लगेच केलं. प्राचार्य, शिक्षक यांना स्वतः फोन करून बोलवून घेतलं. ते माझे भाऊ देखील या बहिणीसाठी लगेच धावत आले. यावेळी शुभांगी पाटील यांचं अनोख्या स्वागत केलं. एकनाथ खडसे यांनी शुभांगी पाटील यांचा शाल देऊन सत्कार केला. त्यावर पाटील म्हणाल्या की, माझ्या अंगावर शाल टाकत खडसे यांनी मला माहेरची साडी दिली. आई वडिलांकडून जो आशीर्वाद मिळाला हवा तो मला वडिलांकडून मिळाला, असही शुभांगी पाटील यांनी यावेळी सांगितलं.