माढ्यात शिंदेंच्या घराणेशाहीला यंदा ब्रेक; विधानसभेचा झटका की दुसरे काही….

Solapur Zilla Parishad Election: माढ्यातील शिंदे घरातील एकही जण यंदा झेडपी किंवा पंचायत समितीच्या रिंगणात नाही.

Solapur Jilla Parishad Babnarao Shinde And Sanjay Shinde

Solapur Jilla Parishad Babnarao Shinde And Sanjay Shinde

Solapur Zilla Parishad Election : झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वत्रच घराणेशाही दिसतेय, सर्वच नेत्यांनी आपले मुलं, पत्नी, यांना राजकारणाच्या आखाड्यात उतरविलंय. सोलापूर जिल्ह्यात (Solapur Zilla Parishad Election) सर्वाधिक राजकीय नेत्यांचे नातेवाइक निवडणुकीच्या रिंगणात आहेत . पण याला एक अपवाद आहे शिंदे कुटुंब. माजी आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde), माजी आमदार संजयमामा शिंदे (Sanjay Shinde) व त्यांचे बंधू रमेश शिंदे या तिघा भावांतील कुटुंबातील एकही जण निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्याचे कारण काय आहे, आता ते कुणाचा प्रचार करत आहेत, हेच जाणून घेऊया


दोन्ही बंधू एकाचवेळी आमदार

बबनराव शिंदे व संजयमामा शिंदे हे दोघे बंधू 2019 ला एकाचवेळी आमदार होते. बबनराव शिंदे हे माढ्यातून सहावेळा आमदार राहिलेले आहेत. ते राष्ट्रवादीचे आमदार होते. तर संजयमामा शिंदे हे करमाळ्यातून अपक्ष निवडून आले होते. पण 2024 च्या विधानसभेला फासे उलटे फिरले. बबनराव शिंदे यांना उमेदवारी केली नाही. त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे अपक्ष रिंगणात होते. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांना त्यांना पराभूत केले. तर तिकडे करमाळ्यात अपक्ष रिंगणात उतरलेले संजयमामा शिंदे हे ही पराभूत झाले. दोन्ही मतदारसंघात काका-पुतणे पराभूत झाले. त्यामुळे दोघांच्या राजकारणाला ब्रेक बसला.


तिघा भावाचे मुले राजकारण, पण यंदा माघार

झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तिघा बंधूंच्या घरातील कोणीच रिंगणात नाहीत. रणजितसिंह बबनराव शिंदे हे माढा पंचायत समितीचे सभापती राहिलेले आहेत. तसेच मानेगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. तर त्यांचे बंधू विक्रमसिंह बबनराव शिंदे हे माढा पंचायत समितीचे सभापती राहिलेले आहेत. तर यशवंत संजयमामा शिंदे हे निमगावचे सरपंच राहिलेले आहेत. तर धनराज रमेश शिंदे हेही पंचायत समिती सदस्य राहिलेले आहेत. यंदा मात्र तिघांच्या घरातून कुणीच पंचायत समिती किंवा झेडपीसाठी उमेदवारी केलेली नाही.


रश्मी बागल व संजयमामा शिंदे एकत्र

करमाळ्यात झेडपी व पंचायत समितीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. येथील आमदार नारायण आबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहेत. त्यांना रोखण्यासाठी भाजपच्या रश्मी बागल व संजयमामा शिंदे हे एकत्र आले आहेत. ते आता भाजपचा प्रचार करत आहेत. तर माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटील यांना रोखण्यासाठी रणजितसिंह शिंदे हे भाजपबरोबर गेले आहेत.


सभापतीपदाची कार्यकर्त्यांना संधी

पंचायत समितीचे सभापती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. तरी शिंदे कुटुंबातील कोणालाही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरविण्यात आलेले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह शिंदे यांच्या पराभवानंतर हा निर्णय अधिक दूरदृष्टीतून घेतल्याची परिसरात जोरात चर्चा सुरू आहे. सामान्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी, स्थानिक स्वराज्य संस्थांची पदे एका कुटुंबापुरती मर्यादीत राहू नये, या भूमिकेतून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबाच्या या भूमिकेमुळे राजकीय क्षेत्रात सकारात्मक उदाहरण पाहिले जातंय.

Exit mobile version