Solapur Zilla Parishad: सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी विधानसभेच्या पराभवाचा बदला घेतला आहे. सातपुते यांच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर (MLA Uttam Jankar) यांच्या मुलाचा पराभव केलाय. तर पंचायत समितीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील पराभूत झालेत. पण ते माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गटातून विजयी झाले आहेत. गण आणि गट अशा दोन्ही ठिकाणाहून ते निवडणुकीच्या रिंगणात होते.
गुरसाळे गणात अर्जुनसिंह मोहिते पाटील पराभूत पण गटातून विजयी
माळशिरस तालुक्यातील दहिगाव गटात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती हिला भाजपने रिंगणात उतरविले होते. तर आमदार उत्तम जानकरांचा मुलगा जीवन याला राष्ट्रवादीने टिकीट दिले होते. त्यामुळे येथे चुरशीची लढत झाली. त्यात राम सातपुते यांच्या पत्नी विजयी झाल्या आहेत. राम सातपुते यांचा लोकसभा आणि विधानसभेला पराभव झाला होता. त्याचे उट्टे मात्र जिल्हा परिषदेला राम सातपुते यांनी काढले आहेत. तर दहिगाव-गुरसाळे गणात अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला आहे. मोहिते कुटुंबासाठी हा धक्का आहे. पण फोंडशिरस गटातून ते विजयी झाले आहेत.
कल्याणशेट्टी यांची पत्नी, भाऊ विजयी
अक्कलकोट तालुक्यात भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी हे विजयी झाले आहेत. त्यांना चपळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली होती. तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची पत्नी शांभवी कल्याणशेट्टी या चपळगाव गणातून विजयी झाल्या आहेत.
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पुतणा विजयी
माढा तालुक्यातील मानेगाव गटातून भाजपचे पृथ्वीराज सावंत हे विजयी झाले आहेत. पृथ्वीराज सावंत हे शिवसेना सोडून भाजपमध्ये गेले होते.
झेडपीच्या माजी अध्यक्षाचा पराभव
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या इंद्रजित पवार यांना त्यांचा पाच हजार मतांनी पराभव केलाय. साठे यांना 7875 मते मिळाली. तर इंद्रजित पवार यांना 12,836 मते मिळाली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे बंधू पराभूत
मोहोळ तालुक्यातील नरखेड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील हे पराभूत झाले आहे. ते शिंदेसेनेकडून रिंगणात होते. त्यांना भाजपचे लखन शिंदे यांनी पराभूत केले. एकप्रकारे भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांना उमेश पाटील व त्यांच्या बंधू यांना झटका दाखविला.
