Download App

सुधीर तांबे अर्ज भरणार, पण गर्दी करू नका का म्हणाले?

  • Written By: Last Updated:

अहमदनगरः नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे हे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या जागेवरून तीन वेळेस निवडून आलेले डॉ. सुधीर तांबे यांच्याविरोधात भाजप तगडा उमेदवार देण्याची चर्चा होती. पण अद्याप भाजपकडून उमेदवार जाहीर झाला नाही. या ठिकाणी भाजपकडून वेगळा चमत्कार केला जाईल, असेही बोलले जात होते. परंतु अद्याप तरी भाजपकडून उमेदवारही जाहीर झालेला नाही. त्याचीही राजकीय चर्चा सुरू आहे.

या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे. या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील काँग्रेसमधील एखाद्या नेत्याला उमेदवारी देता येते का याची तयारी पक्षाकडून होती. त्यात या मतदारसंघातून सलग तीन वेळेस निवडून आलेले डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या वतीने तांबे हे उमेदवारी अर्ज भरणार आहे.

तांबे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पण त्यांच्या ट्विटची वेगळी चर्चा सुरू झाली आहे. अतिशय साध्या पद्धतीने हा उमेदवारी अर्ज भरणार असल्याने कुणीही गर्दी करू नये. लवकरच सर्व नेत्यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा आयोजित करणार आहे. यात आपण सर्व निमंत्रित आहात, असे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.

पदवीधरच्या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबेंऐवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. भाजप आणि काँग्रेसच्या गोटामध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली होती. दुसरीकडे भाजपनेही अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. या जागेवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांचेही नाव चर्चेत होते. परंतु अद्याप त्यांचे नाव जाहीर झालेले नाही. भाजपकडून या मतदारसंघात नगर जिल्ह्यातून उमेदवार देऊन राजकीय खेळी केली जाईल, असे बोलले होते. पण अद्याप भाजपने उमेदवार जाहीर केलेला नाही.

Tags

follow us