पुणे : देशात काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) येऊ घातल्या आहेत. त्यासाठी भाजपसह (BJP)अन्य पक्षांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एनडीएसह (NDA) इंडिया आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून समोर येत आहेत. मोदी पुण्यातून निवडणूक लढणार, ही चर्चा सुरू झाल्यानंतर पुणे भाजपनेही कंबर कसली आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. फडणवीस हे एक नंबरचे ढ आहेत, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढविल्यास राज्यातील 48 पैकी 48 खासदार आमच्याकडून निवडून येतील. राज्याचे आणि पुण्याचे नशीब उजळेल, विरोधकांचे डिपॉजिट जप्त करू असे भाजप नेते संजय काकडे यांनी म्हटले आहे. आम्ही रक्ताचं पाणी करून मोदींना निवडून आणू, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, आज संजय काकडे यांनी पंतप्रधान यांना पत्र लिहून पुण्यातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक लढवून भाजपने 90 टक्के जागा जिंकल्या, त्याचप्रमाणे पुण्यातही निवडणूक लढवली तर भाजप 100 टक्के जागा जिंकेल, असे काकडे यांनी पत्रात म्हटले आहे.
सरकारला सत्तेची मस्ती चढली; आंदोलकांवरील लाठीचार्जवरून विरोधकांनी घेरले !
पंतप्रधान पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलतांना त्या म्हणाल्या की, मोदी पुण्यात येत आहेत म्हणजे त्यांना त्यांच्या मतदारसंघातून हरण्याची भीती आहे. ते आता सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत. आधी मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला होता. आता कोणावर करतात कुणास ठाऊक. भाजप नेते या निर्णयाचे स्वागत करतात म्हणजे नही स्वागत करेगी तो मरेंगी बुढी, असं भाजपच्या नेत्याचं झाल्याचं अंधारे म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणूक लढवत असतील आणि त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे ४८ खासदार निवडून येणार असतील, तर महाराष्ट्र भाजपची संपूर्ण जबाबदारी, मदार आता फक्त मोदींवरच आहे. देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा काहीच नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस एक नंबरचे ढ आहेत, असा जोरदार घणाघात सुषमा अंधारेंनी केला.
यावेळी त्या भाजपवर बोलतांना म्हणाल्या की, चंद्रकांत पाटलांचं पालकमंत्री पद गेलं तरी किमान भाजपने त्यांना निर्णय प्रक्रियेत तरी ठेवावं. कारण फडणवीसांच्या कपटीनीमुळं आणि महत्वकांक्षेमुळं आसिष शेलाराचं कार्यक्षेत्र मर्यादीत झालं. कानामागून आलेले दरेकर आणि प्रसाद लाड अत्यंत मुजोर झालेले आहेत. अडवानींचा भाजप पक्ष आता राहिला नाही. आता भारतीय जनता पार्टी भाड्याने जमवलेला पक्ष झालेला आहे, अशी टीका त्यांनी केली.
मोदी सरकारने पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं. त्यावरही अंधारेंनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, मणिपूरमध्ये नग्न महिलांची धिंड काढली गेली, तेव्हा विशेष अधिवेशन का बोलावलं नाही. आता विरोधक एकटवल्यानं मोदींना निवडणूका लवकरात लवकर घ्यायच्या आहेत. त्यांनी इंडियाच्या बैठकीचा धसका घेतला आहे. त्यामुळं ते गॅसचे भाव कमी करत आहेत, विशेष अधिवेशन घेत आहेत, अशी टीका अधारेंनी केली.