Download App

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राग; निशाणा नितीन गडकरी : धमकी कॉलचे PFI कनेक्शन उघड

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मागील ३ महिन्यांपासून येत असलेल्या धमकी आणि खंडणी कॉल प्रकरणाचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी असलेल्या संघटनेशी कनेक्शन उघड झाले आहे. जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा उर्फ शाकीर याने फोनमधील एका सॉफ्टवेअरचा वापर करुन गडकरी यांना धमकी दिल्याचे आणि त्यांच्याकडे खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान, नागपूर पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. (Threats to BJP minister Nitin Gadkari Nagpur police arrest Jayesh Pujari connection PFI)

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या धमकीप्रकरणात नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहातून जयेश पुजारीला ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्याच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या. जयेश पुजारी मागील १० वर्षांपासून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. याच दरम्यान, त्याच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल द्वेष निर्माण झाला. याच रागातून त्याने धमकी देण्याचा प्लॅन केला. त्यानंतर त्याने नितीन गडकरी यांना टार्गेटवर ठेवून त्यांच्या कार्यालयात फोन केले.

कोण आहे जयेश पुजारी?

जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा हा मुळचा कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्याचा रहिवासी. २०१२ पासून तो बेळगावच्या विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत आहे. नागपूर पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी तो बेळगावच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. दुहेरी हत्याकांडातील तो आरोपी आहे. नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकणी आणि खंडणी मागितल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील १० वर्षांपासून जयेश पुजारी पीएफआयच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात येत गेला. २०१४ ते २०१८ मध्ये जयेशचा संपर्क टी. नासिर उर्फ कॅप्टन आणि फारुख नावाच्या पीएफआयच्या कॅडरसोबत आला. या दोघांनीच जयेशला बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले. या दरम्यान, त्याचे धर्मपरिवर्तनही करण्यात आले. त्यानंतर त्याचे नाव शाकीर ठेवण्यात आले. नॅशनल एक्सिकेटिव्ह कॉऊन्सिलचा सचिव असलेल्या मोहम्मद अफसर पाशाने त्याचा ब्रेन वॉश केला. त्याला कट्टरवादी विचारसरणीकडे ओढले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी द्वेष निर्माण केला. बेळगावमध्ये असताना तो मृदुल, युसूफ आणि राशिद मलबारी यांच्याही संपर्कात आला.

यानंतर मागील वर्षी पीएफआय बंदी आल्यानंतर जयेश पुजारीच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी तीव्र राग निर्माण झाला. याच रागातून त्याने धमकी देण्याचा प्लॅन केला. टार्गेट निवडलं नितीन गडकरी. त्यानंतर त्याने तुरुंगातून मोबाईलवरुन नितीन गडकरी यांना धमकी देणारे फोन केले. त्याच्या फोनमध्ये विशेष सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यात आले होते. याच माध्यमातून तो गडकरी यांना धमकी देत होता. तुरुंगातूनच तो आपल्या कुटूंबाला व्हिडीओ कॉल व व्हॉईस कॉल देखील करत असल्याची पोलिसांची माहिती आहे.

तुरुंगात मिळायची 5 स्टार सेवा

मिळालेल्या माहितीनुसार, जयेश पुजारीला तुरुंगात 5 स्टार सुख सुविधा मिळत होत्या. तुरुंगात तो स्मार्ट फोन वापरायचा. तुरुंगातूनच तो आपल्या कुटूंबाला आणि मित्रांना व्हिडीओ कॉल व व्हॉईस कॉल करायचा. तुरुंगात त्याला मागेल तेव्हा मांसाहार मिळायचा. जयेशच्या याच सर्व ऐशोआरामवर तब्बल १८ लाख रुपये खर्च आला. पण त्याच्यावर हा खर्च नेमका केला कोणी? असा सवाल सध्या विचारला जात आहे.

Tags

follow us