Download App

नगर धर्मांतरण प्रकरण: पोलीस अधिकारी प्रताप दराडेंची बदली

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील ब्राम्हणी येथील एका हिंदू महिलेचे बेकायदेशीर धर्म परिवर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या भारतीय मानवाधिकार परिषदेने उघडकीस आणला होता. या धर्मांतरण प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार राम सातपुते यांनी ‘पीआय’ प्रताप दराडे याचे धर्मांतराला संरक्षण असल्याचा आरोप केला.

यासंदर्भात नगर धर्मांतरण प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांना पोलिस नियंत्रण कक्षात हलवण्याचे निर्देश शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. एवढेच नव्हे तर दराडे यांच्या संपत्तीची ‘एलसीबी’कडून चौकशी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. राम सातपुते यांनी नगर जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनरी कमल सिंघ याने दलित, मातंग, आदिवासींचे धर्मांतरण सुरू असल्याच्या घटनेकडे लक्षवेधीतून लक्ष वेधले. ‘पीआय’ प्रताप दराडे याचे धर्मांतराला संरक्षण असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला. ‘पीआय’ दराडेंवर कारवाई करणार का? त्याच्या संपत्तीची चौकशी करुन निलंबित करण्यात यावे अशी मागणी सातपुते यांनी केली.

लक्षवेधीवर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी धर्मांतरण प्रसंगी गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. पाच महिने होऊनही आरोपी ख्रिश्चन मिशनरी कमल सिंघ फरार असल्याची वस्तुस्थिती आहे. अप्पर पोलिस अधीक्षकामार्फत पीआय प्रताप दराडे याची चौकशी केली जाईल. आणि तोपर्यंत त्याला जिल्हा नियंत्रण कक्षात हलवण्यात येईल, अशी घोषणा शंभूराज देसाई यांनी केली. हरिभाऊ बागडे यांनी गावपातळीवर दखल घेतली जावी असे सांगितले. त्यावर मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले. संजय गायकवाड यांनी ‘पीआय’ दराडे याच्या संपत्तीची चौकशीची मागणी केली. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संपत्तीची चौकशी केली जाईल अशी घोषणा मंत्र्यांनी केली.

Tags

follow us