Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल आपलं उपोषण मागे घेतले आहे. आरक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. मात्र साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानं अनेकांचे वाईट मनसुबे उधळले गेले, अशी टीका त्यांनी केली.
‘दादां’वरील आरोपांनंतर बोरवणकरांचं विमान तिकीट अन् निमंत्रणही रद्द; आपच्या नेत्याची पोस्ट शेअर
आज माध्यमांशी बोलतांना सामंत यांनी मनोज जरांगे पाटील आणि सहकाऱ्यांचे उपोषण सोडल्यानं आभार मानले. सामंत म्हणाले, मी कालच्या शिष्टमंडळात होतो आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी सखोल चर्चा झाली. आमचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे. मराठा समाजाला पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असा आमचा विश्वास आहे.
ते म्हणाले की, जरांगे पाटील यांनी आम्हाला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. या दोन महिन्यांत अधिक मनुष्यबळ वापरून अधिक वेगाने काम करू, महाराष्ट्रात मराठा समाजातून अनेक मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात आणि त्यासाठी ते प्रामाणिकपणे व सकारात्मकतेने काम करत असल्याचे सामंत यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, जरांगे पाटील यांनी काल उपोषण सोडले म्हणून अनेक लोकांचे वाईट मनसुबे उधळून गेले. 2014 ते 2019 या काळात मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात शांततेने मोर्चे काढले होते. कधीही हिंसाचाराचा मार्ग पत्करला नाही परंतु यावेळी काही लोकांनी हिंसाचार करून सरकार आणि जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांतता राखण्याचे आणि जाळपोळ न करण्यचां आवाहन केलं होतं व तोडफोड करू नये, असं आवाहन करूनही अनुचित प्रकार घडले.
दरम्यान, कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केलेल्या मागणीवर शासनाने यापूर्वीच काम सुरू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. या प्रश्नावर शिंदे समिती गांभीर्याने व ठामपणे काम करत आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आणखी कुणबी नोंदी सापडतील, असंही सामंत म्हणाले.