राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण! सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच विमानात; हस्तांदोलन.

Untitled Design 52

Untitled Design 52

Uddhav Thackeray and Fadnavis travel together by air : राज्यातील राजकारणाचं चित्र सध्या अतिशय वेगाने बदलत असल्याचा पाहायला मिळत असून शिवसेना ठाकरे गटाला बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतर आता आणखी एका घडामोडीने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात असून, राज्यातील सत्तासमीकरणांवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घडामोडीनंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. अनेक नेत्यांनी या पक्षांतराला लोकशाहीवरील आघात असल्याचे सांगत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मात्र, या टीकेदरम्यान भाजपावर तुलनेने कमी आक्रमक भूमिका घेतली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशातच आता एक असे दृश्य समोर आले आहे, ज्यामुळे राजकीय चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे.

मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रवास केला. योगायोगाने दोन्ही नेते एकाच विमानात असल्याचे समोर आल्यानंतर विमानतळापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत याची चर्चा सुरू झाली. विमानात भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी काही क्षण एकमेकांशी संवाद साधत प्रकृतीची आणि कुशलक्षेमाची विचारपूसही केली.

सुजय विखेंचा त्याग म्हणूनच मी आमदार… विवेक कोल्हेंची मंचावरून जाहीर कबुली

या वेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत तसेच ठाकरे गटातील इतर काही प्रमुख नेतेही उपस्थित होते. विमानातील हा प्रसंग उपस्थित प्रवाशांनी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काय, याबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, या भेटीबाबत माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी नेहमीच्या मिश्कील शैलीत प्रतिक्रिया दिली. “आम्ही तिघं भेटलो, हीच मोठी बातमी आहे,” असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य टाळले. फडणवीस यांच्या या एका वाक्यामुळेही राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सने रचला इतिहास, एआय वकिलाने न्यायालयीन खटल्यात मानवी वकिलांविरोधात मिळवला विजय

दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकाच विमानातील भेट आणि त्यांच्यातील सौहार्दपूर्ण संवाद यामुळे अनेक राजकीय अंदाज व्यक्त केले जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महापालिका निवडणुका आणि बदलणारी राजकीय समीकरणे लक्षात घेता या भेटीकडे केवळ योगायोग म्हणून पाहायचे की त्यामागे काही वेगळे राजकीय संकेत आहेत, याबाबत आता राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे.

तथापि, या भेटीबाबत कोणत्याही नेत्याकडून राजकीय चर्चेची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा केवळ प्रवासादरम्यान झालेला औपचारिक शिष्टाचार होता की त्यामागे काही राजकीय संदेश दडलेला आहे, याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर अवघ्या काही तासांत समोर आलेल्या या दृश्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना नक्कीच सुरुवात झाली आहे.

Exit mobile version