नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने आज एकनाथ शिंदे यांचे NIT प्रकरण ज्या सहजतेने सांगितले ते प्रकरण एवढे सोपे असते तर इतक्या वर्ष ते न्यायालयात का चालू होते ? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेमध्ये विचारला. विधानसभा अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे काल नागपुरात दाखल झाले होते. अधिवेशनाला उपस्थिती लावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले कि NIT भूखंड घोटाळ्यात राजकीय हस्तक्षेप अयोग्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या पदावर राहणे योग्य नाही. आज विधानपरिषदेत आमचा विरोधीपक्ष नेता आहे त्यांनी आज तिथे प्रश्न विचारला उद्या विधानसभेत हा विषय चर्चेला जाईल. अशी माहिती त्यांनी दिली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर बोलताना ते म्हणाले की ग्रामपंचायत निवडणूका या स्थानिक पातळीवर लढल्या जातात. त्यामुळे यावर आज बोलता येणार नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा मोर्चा हा नॅनो मोर्चा असल्याची टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनाही उत्तर दिले. ते म्हणाले की आमचा मोर्चा फडणवीस साईजचा होता. त्यामुळे आता त्यांनी ठरवावं कि मोर्चा छोटा होता कि मोठा होता. पण महामोर्चामुळे राज्यात जनता आक्रमक होताना दिसत आहे. मोर्चानंतर राज्यात अनेक शहरात बंद झाला. भविष्यात याचे आणखी परिणाम पाहायला मिळतील.
सीमावाद आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले कि मुख्यमंत्री म्हणतात कि आम्ही कर्नाटकात लाठ्या खाल्ल्या. त्यांनी तेव्हा लाठ्या खाल्या पण आज सीमाभागातल्या सामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर ते कधी भूमिका घेणार आहेत. त्याचवेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावरही केली. ते म्हणाले कि एवढं बोलल्यानंतरही राज्यपाल केंद्रात पत्र लिहून विचारतात, काय करू ? राज्यपालांनी पत्र लिह्ण्याऐवजी राजीनामा देऊन निघून गेलं पाहिजे.