मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली पण त्यांच्या सभेचे मैदान भरले नाही. बाळासाहेबांनी संभाजीनगरमध्ये दंडवत घातला होता पण तुम्ही तर काँग्रेससमोर लोटांगण घातले आहे. (Uddhav Thackeray) उद्धवजी, मी हिंदुत्व सोडलं आहे का? असेल तर सांगा मी आत्ता घरी जातो असं तुम्ही मुस्लिमांना विचारलं! आता ते तर काही तुम्हाला विचारणार नाही, आम्हीच विचारतो. मा.बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांना सतत विरोध केलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत सत्तेसाठी एकत्र आलात (सत्तेसाठी एकत्र आलो असं तुम्हीच काल म्हणालात) ही हिंदुत्वाशी तडजोड नव्हती का? असा सवाल कालच्या सभेनंतर उद्धवजींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी केला.
छत्रपती संभाजीनगरमधे झालेल्या प्रकाराबाबत तुम्ही काँग्रेस; राष्ट्रवादी; एमआयएमच्या दबावाखाली एक ब्र शब्दही बोलला नाहीत ? मा. बाळासाहेब असे गप्प राहिले असते का? इम्तियाज जलील आणि एमआयएम बद्दल काहीही बोलला नाहीत म्हणून त्यांनी तुमचे आभार सुद्धा मानले. ही पुढच्या युतीची नांदी समजायची का ? असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
छत्रपती संभाजीनगर नामकरण सरकार जाणार आहे असं दिसल्यावर केलंत? उलट काय गरज आहे, नामांतराची मी म्हणतोय ना असं म्हणत अडीच वर्षे दुर्लक्ष का केलंत? औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होत असताना शांत का राहिलात ? अफझलखानाच्या कबरीभोवती झालेलं अतिक्रमण काढण्याचं धारिष्ट दाखवलं नाही? आताच्या सरकारने ते काढलं तर हिंदुत्ववादी स्वत:ला मानता तर किमान अभिनंदन करण्याचा मनाचा मोठेपणा का दाखवला नाही? असा खोचक टोला लगावला.
पीएफआय सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असताना एकही शब्द तुम्ही उच्चारला नाही? मा. बाळासाहेबांचा उल्लेख जनाब असा करून त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेवर डाग कुणी लावला? अजाण स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केलीत? मस्जिदवरील भोंगे उतरले पाहिजेत असा मा.बाळासाहेबांचा विचार असताना त्याबाबत केलेल्या आंदोलनात मनसे कार्यकत्याविर गुन्हे का दाखल झाले? असा सवाल देखील करण्यात आला आहे.
बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करणं हे आमचं हिंदुत्व असं म्हणता, मग शिवसैनिक मुख्यमंत्री करेन असा शब्द सा.बाळासाहेबांना दिला होता तो कुठलीही किंमत मोजून का पूर्ण केला नाही? उत्तरं मिळणार नाही माहित आहे, तरी प्रश्न विचारण्याचा भाबडेपणा केला आहे. असा खोचक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी लगावला आहे.