मुंबई : गर्व से कहो हम हिंदू है ! गर्व से कहो हम हिंदू है… जय भवानी…जय शिवाजी, जय शिवराय… जय श्रीराम… जय श्रीराम… हर हर महादेव अशा घोषणा काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक देत होते. महाविकास आघाडीत आल्यापासून शिवसैनिकांची धार बोथट झाली होती. परंतु पुन्हा एकदा मुंबईत उद्धव ठाकरेंच्यासमोर अशा घोषणा देण्यात आल्या. निमित्त होतं अयोध्यातील राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणात आयोजित ठाकरे गटाचे रामरक्षा आंदोलन. परंतु ठाकरे यांच्या या आंदोलनामुळे वेगळीच राजकीय चर्चा सुरू झालीय. पक्षातून लोक सोडून जात आहे. राजकीय अस्तित्वपणाला लागल्याने उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रखर हिंदुत्वाकडे जाण्याचा निर्णय घेतलाय का ? ठाकरे पुन्हा भाजपकडे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत का ? महाविकास आघाडीतून ठाकरे बाहेर पडणार का असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दादर येथील राम मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबईतील पदाधिकारी यांच्याबरोबर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित होते. या आंदोलनातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपवर जोरदार टीका केली. देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. आता बारा वर्षात काय झाले आपण पाहात आहोत. गैरफायदा घेत सत्ता भोगत आहे. रामालाही यांनी सोडलं नाही, असे ठाकरे म्हणाले. राम मंदिर वही बनेंगे असे आम्ही म्हणालो होतो. शिवसेनेने जेवढे काम केले आहे, तेवढे कोणत्याच पक्षाने केलेले नाही. कारसेवा केली, रथ यात्रेत सहभागी आहे, रक्त सांडले, असे सांगण्यासही ठाकरे विसरले नाहीत. त्यामुळे राज्यभरात रामरक्षा आंदोलन करण्याची हाक त्यांनी दिली.
ठाकरेंना पुन्हा भाजप जवळ घेईल का ? प्रकाश अकोलकर
उद्धव ठाकरे यांच्या नव्या भूमिकेबाबत ज्येष्ठ पत्रकारांच्या भूमिका जाणून घेतल्या. शिवसेनेला जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर म्हणाले, ठाकरे हे पुन्हा हिंदुत्वाकडे जाणे हे एक वर्तुळ पूर्ण झालेले आहे. ते पुन्हा भाजपकडे जातील का ? त्यांना भाजप भविष्यात जवळ घेईल हा मात्र प्रश्न आहे.
भाजपला कोंडीत गाठण्याची संधी ठाकरेंना साधली-विजय चोरमारे
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी वेगळे मत मांडलं. ते म्हणाले उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत आल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सातत्याने उद्धव ठाकरेंना टार्गेट केले जात होते. ठाकरेंनी हिंदुत्व सोडले आहे, अशी टीका केली जात आहे. तो गिल्ट त्यांच्या मनात आहे. नेमकी अयोध्यातील भ्रष्टाचार सापडल्यानंतर भाजपला कोंडीत गाठण्याची संधी ठाकरेंना मिळाली आहे. त्यातून ते पुन्हा आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतलीय. सध्या तरी कुठल्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस वेगळा प्रयत्न करत आहेत. तर उद्धव ठाकरे हे वेगळ्या मार्गाने उतरले आहेत. यामागे ठाकरेंचे वेगळे काही नाही.
शिवसेना स्थापनेचा थोडा इतिहास पाहिला तर शिवसेनेची स्थापना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली नव्हती. शिवसेना मराठीच्या मुद्द्यावर लढत होती. त्यात फार यश मिळाले नाही. तसेच मुंबईत उत्तर भारतीय लोकांनी बस्तान बांधले होते. त्यातून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. शर्ट पॅन्ट घालणारे बाळासाहेब हे भगवे कपडे घालू लागले. त्यातून राजकीय फायदा झाला. मुंबई, मराठवाडा व इतर भागात शिवसेनेची क्रेज निर्माण झाली होती. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांची राजकीय वारस झाले. परंतु ते हिंदुत्वाबाबत फार आक्रमक नव्हते. ते हिंदुत्वाचा मुद्द्यावर बोलायचे. पण भाषा संयमी होती. त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा मुद्दा भाजपने पुढे केला होता. परंतु आता ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागलेली आहे. पुन्हा संघटना वाढविण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन जनतेत जाण्याचा निर्णय ठाकरेंना घेतल्याचे काही जणांचे राजकीय मत आहे. यामुळे ठाकरेंना पुन्हा किती फायदा होई हे भविष्यात समोर येईल हे नक्की.
