प्रशांत गोडसे-प्रतिनिधी, मुंबई
Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2026) नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस (30 एप्रिल) राहिले आहेत. परंतु महायुती असो की महाविकास आघाडी उमेदवार मात्र अद्याप फिक्स झालेले आहे. त्यात सत्ताधारी महायुतीमध्ये जोरदार चुरस निर्माण झालेली आहे. विधानपरिषदेच्या इच्छुकांची संख्या वाढलेली असल्याने सत्ताधारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढलेली आहे.
विधानसभेतील सदस्यांची संख्याबळ पाहता महायुतीला आठ जागा सहज मिळण्याची शक्यता आहे. एका उमेदवाराला सुमारे 29 मतांचा कोटा लागतो. महायुतीकडे 228 आमदार असल्याने त्यांचे पारडे जड आहे. विरोधी महाविकास आघाडीला फक्त एक जागा निश्चित मानली जात आहे.
संख्याबळाचा विचार करता भाजपाचे पाच जागा निवडून येतील. ज्यात राम सातपुते, संदीप जोशी, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, दादाराव केचे, संजय केणेकर आदी नावे चर्चेत आहे. मात्र, केंद्रीय नेतृत्वाकडे शॉर्टलिस्ट पाठवण्यात अली असून आज उशिरा किंवा उद्या दिल्लीतून भाजपाच्या पाच नावांची घोषणा होऊ शकते.
शिवसेना (शिंदे गट) कडून संख्याबळानुसार दोन जागा निवडून येणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शीतल म्हात्रे, शायना एनसी, किरण पावस्कर, संजय मोरे, बच्चू कडू, दिपक सावंत आणि रवींद्र फाटक यांची नावे चर्चेत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातही एक जागा वाटपावरून अंतर्गत चर्चा सुरू आहे. प्रदेश कार्यालय येथे सध्या भेटीगाठींच सत्र सुरू आहे. आज संध्याकाळी कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधानपरिषदेच्या उमेदवार नाव निश्चित होऊ शकतो नावाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मते असल्याने आणखी एक उमेदवार उभे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विक्रम काकडे, झिशान सिद्धीकी, हर्षवर्धन पाटील, सुरेश बिराजदार, राजेंद्र जैन यांची नावे चर्चेत आहेत.
विरोधकांकडे फक्त एक जागा येणार असल्याने त्या जागेसाठी शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसमध्ये चांगलीच स्पर्धा आहे. काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना त्या जागेसाठी उमेदवार होण्याची विनंती केली आहे. ठाकरे यांनी याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. आघाडीतील समन्वय साधण्यातही वेळ जात असल्याचे दिसते.
संख्याबळाच्या गणितातून वाटप प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याच्या जागांसाठी इच्छुक नेत्यांची यादी तयार करत आहे. जाती-समाज समतोल, पक्षातील संतुलन आणि प्रभावी आमदारांच्या पसंतीचा विचार करावा लागतो. भाजपसारख्या पक्षात मोठ्या निर्णयांसाठी दिल्लीतून मंजुरी मिळतं असते. महायुतीत काही नेते बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करताय , तर काही अधिक उमेदवार उभे करून विरोधकांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही निवडणुकांप्रमाणे शेवटच्या क्षणी अनपेक्षित नावे जाहीर होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवत आहे. महाविकास आघाडीत एका जागेसाठी जास्त दावेदार असल्याने तिथेही ताळमेळ बसवणे कठीण होतंय. शिवाय, मतांची खात्री करून ‘क्रॉस वोटिंग’ टाळण्यासाठी उमेदवारांची निवड काळजीपूर्वक करणे रणनीतीचा एक भाग बनला आहे.
बच्चू कडूंना शिवसेनेची ऑफर
प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांना शिंदे शिवसेनेकडून विधान परिषदेच्या जागेसाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत बच्चू कडू उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. महाविकास आघाडीकडनं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं जर नाव निश्चित झालं तर विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणारी निवडणूक ही बिनविरोध होऊ शकते अशा प्रकारची संकेत देखील मिळत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत चालणारी रणनीती, अंतर्गत मतभेद आणि ‘सेफ’ गणित जुळवण्याच्या प्रयत्नांमुळेच हा उशीर होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.आज रात्री उशिरा किंवा उद्या दिवसभरामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर होऊ शकतात.
